Aadesh & Suchitra Bandekar Dance Video : आदेश व सुचित्रा बांदेकरांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकर आज ( २ डिसेंबर ) लग्नबंधनात अडकणार आहे. सोहम बांदेकर पूजा बिरारीशी लग्नगाठ बांधणार आहे. शनिवारपासून या दोघांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सोहम-पूजाच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय सोमवारी रात्री या दोघांचा संगीत सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता.
पूजा व सोहम यांनी संगीत सोहळ्यासाठी ट्विनिंग लूक केला होता. दोघंही इंडो-वेस्टर्न लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. पूजा-सोहमने अनेक लोकप्रिय गाण्यांवर एकत्र डान्स केला. मात्र, या दोघांच्या संगीत सोहळ्यात सर्वाधिक चर्चा होतेय आदेश व सुचित्रा बांदेकर यांनी केलेल्या जबरदस्त डान्सची! “मुलाच्या लग्नात प्रचंड धमाल करणार” असं बांदेकरांनी आधीच सांगितलं होतं. या दोघांनी जोडीने शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
आदेश व सुचित्रा बांदेकर लेकाच्या संगीत सोहळ्यात “मेरे महबूब मेरे सनम…” या गाण्यावर थिरकले आहेत. या दोघांच्या डान्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘मेरे महबूब मेरे सनम’ हे गाणं शाहरुख खानच्या ‘डुप्लिकेट’ सिनेमातील आहे. हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आज २७ वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कायम आहे. हे गाणं उदित नारायण व अलका याग्निक यांनी गायलं आहे.
आदेश व सुचित्रा बांदेकरांच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, सोहमचा लग्नसोहळा लोणावळ्यात पार पडत आहेत. आज पूजा-सोहमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
