Aadesh Bandekar : श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित व पवित्र मानला जातो. हा महिना धार्मिक उपक्रमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. सणांचा गोडवा वाढवणाऱ्या या महिन्यात तमाम महिला वर्गाला उत्सुकता असते ती मंगळागौर सणाची. ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांमध्ये सुद्धा प्रेक्षकांना मंगळागौर सणाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत लवकरच मंगळागौर स्पर्धा रंगणार आहे. या मंगळागौर स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची उपस्थिती. आता बांदेकर त्यांची निर्मिती असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत उपस्थिती लावतील असा अनेकांचा अंदाज होता. पण, ते एका वेगळ्या मालिकेत एन्ट्री घेणार आहे. आदेश बांदेकर यामध्ये सूत्रसंचालक आणि परीक्षण अशा दोन भूमिका निभावणार आहेत.

विजेत्या जोडीला काय मिळणार?

अद्वैत-कलाची हटके लव्हस्टोरी असलेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत लवकरच मंगळागौर स्पर्धा पार पडणार आहे. कोल्हापुरातील या सर्वात मोठ्या स्पर्धेचं आयोजन आदेश बांदेकर करणार आहेत. या स्पर्धेत सासू आणि सुनेला जोडीने सहभागी व्हायचं आहे. पारंपरिक खेळ खेळून ही स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या जोडीला सोन्याचं पैंजण आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

Award Banner

मंगळागौरीच्या या स्पर्धेत कला-सरोज यांच्यासह नयना- रोहिणी, रजनी-अनामिका या देखील सहभागी होणार आहेत. सासू-सुनेची ही जोडी स्पर्धेत काय कमाल दाखवते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मंगळागौरी स्पर्धेतले अवघड टप्पे पार करत कोणती जोडी विजयी ठरणार हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत हे मंगळागौर विशेष भाग प्रेक्षकांना १९ ते २६ ऑगस्ट यादरम्यान पाहायला मिळणार आहेत. ही मालिका ९:३० वाजता प्रसारित केली जाते.