Aadesh Bandekar Pandharpur Wari 2026 : आषाढी वारीची सुरुवात यंदा ७ जुलैपासून झालेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूहून पंढरपूरकडे होईल आणि पालखी २५ जुलै रोजी पंढरपूर मध्ये पोहोचेल. सामान्य वारकऱ्यांसह अनेक मराठी सेलिब्रिटीही भक्तीभावाने वारीत सहभागी होतात. आदेश बांदेकर वारीचा हा संपूर्ण प्रवास त्याच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेअर करणार आहेत.
आदेश बांदेकर, त्यांचा मुलगा सोहम आणि सूनबाई पूजा बिरारी हे तिघंही वारीत सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. याचा खास व्हिडीओ त्यांनी युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. आदेश बांदेकर म्हणतात, “आता आम्ही देहूला जाणार आहोत आणि तिथून मग देहू ते पंढरी हा प्रवास सुरू होणार आहे.”
पुढे आदेश बांदेकर सुनेबद्दल म्हणतात, “पूजा गेल्यावर्षी तू पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झाली होतीस…त्यावेळेला खरंतर तू लक्ष्मीच्या पाऊलांनी आमच्या घरात येणार हे ‘ठरलं तर मग’ जणू काही झालेलं होतं…. फक्त ते घरोघरी पोहोचलं नव्हतं. पण, तू जेव्हा आमच्या कुटुंबात आलीस…तेव्हा आनंदाचं एक नवीन पर्व आता सुरू झालं आहे.”
पूजा यावर म्हणते, “गेल्यावर्षी खूपच सुंदर अनुभव आला होता…पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी सुद्धा मला वारी अनुभवता येईल. पण, काम असल्याने मला प्रत्यक्ष जास्त दिवस जाता येणार नाहीये. बाबांच्या युट्यूब चॅनेलवरून मी या वारीचा भाग होणार आहे.”
यानंतर आदेश बांदेकरांनी पूजाला एक हटके प्रश्न विचारला. “गेल्यावर्षी संपूर्ण युनिट होतं…पण, तू आणि सोहमने तुमच्याबद्दल कोणालाच कळू दिलं नाहीत..हे कसं शक्य झालं?”
यावर पूजा काहीशी लाजली अन् म्हणाली, “बाबा असं मला नाही वाटत…कारण, सर्वांना कल्पना होतीच. पण, आपण स्वत:हून ती गोष्ट कोणाला सांगितली नव्हती.” यानंतर दोघंही हसू लागले.
दरम्यान, पूजा बिरारी व सोहम बांदेकर यांचा विवाहसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत पार पडलं होतं. या सोहळ्याला कलाकारांसह राजकीय वर्तुळातील मान्यवरांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.
