Aadesh Bandekar Home Minister : ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम ३१ ऑगस्ट २०२६ पासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २००४ मध्ये या प्रवासाची सुरुवात झाली होती. यानंतर ‘होम मिनिस्टर’ने जवळपास २० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मध्यंतरी या शोने काही काळ ब्रेक घेतला होता. पण, आता पुन्हा एकदा त्याच उत्साहात हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके आदेश भावोजी घराघरांत पोहोचणार आहे.
‘होम मिनिस्टर’चा हा नवीन सीझन सुरू होण्याआधी महाराष्ट्रातील लाखो वहिनींच्यावतीने आदेश बांदेकरांसाठी खास पत्र लिहिण्यात आलं होतं. या पत्राचं वाचन झी मराठीच्या ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमात करण्यात आलं. डॉ. निलेश साबळेने भावोजींसाठी आलेलं पत्र त्यांना वाचून दाखवलं.
निलेश साबळे सुरुवातीला गृहिणींचं पत्र वाचत म्हणतो, “होम मिनिस्टर आणि त्यात मिळणारी पैठणी…ही पैठणी फक्त महाराष्ट्राचं महावस्त्र नाहीये तर एखाद्या महिलेचं संपूर्ण आयुष्य बदलणारा तो सुंदर अनुभव आहे. भावोजी…प्रत्येक महिलेत एक सुपरवुमन दडलेली असतेच. पण, ती तुमच्यामुळे तिला सापडते हे देखील सत्य आहे. आज छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भेटीला येत आहात. याचा सगळ्या वहिनींना प्रचंड आनंद आहे.”
यावर भावुक होत आदेश बांदेकर म्हणतात, “खरंय, मलाही असे अनेक प्रसंग आठवतात. आपल्याला महाराष्ट्राच्या आनंदासाठी अनेकदा स्वत:चं दु:खही विसरावं लागतं. माय-माऊलींनो एक गोष्ट मनापासून सांगतो, तुमच्या घराचं क्षेत्रफळ किती आहे, तुमचं घर लहान आहे की मोठं… याचा झी मराठीला किंवा आम्हाला कधीच फरक पडत नाही किंवा पडणारही नाही. कारण, तुमचं मन खूप मोठं आहे. त्यासाठीच तुम्हाला भेटायला पुन्हा एकदा घराघरांत मी येतोय. ही आनंदाची यात्रा घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत. तेव्हा फक्त आशीर्वाद द्या…लवकरच येतोय तुमच्याघरी!”
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच आदेश बांदेकरांना या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
‘होम मिनिस्टर’च्या नव्या सीझनबद्दल सांगायचं तर, येत्या ३१ ऑगस्टपासून सायंकाळी ६ वाजता प्रेक्षकांना हा नवाकोरा सीझन पाहायला मिळेल. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता पुन्हा एकदा प्रेक्षकांना “दार उघड बये…दार उघड” ही धून ऐकू येणार आहे.
