स्टार प्रवाह वाहिनीवर साधारण तीन महिन्यांपूर्वी ‘पाठराखीण’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमध्ये लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यामध्ये प्रमुख भूमिका साकारतेय. प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या मालिकेत दोन बहिणींच्या सुंदर, अतुट नात्याची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. आता ‘पाठराखीण’मध्ये सध्या प्राजक्ता-आलोक यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. सगळे कलाकार सुद्धा दिवसरात्र मेहनत घेऊन शूट करत आहेत आणि अशातच या कलाकारांच्या भेटीला सेटवर खास पाहुण्या पोहोचल्या होत्या.

‘पाठराखीण’ मालिकेच्या निर्मितीची धुरा बांदेकर कुटुंबीयांच्या ‘सोहम प्रोडक्शन’ने सांभाळली आहे. त्यामुळे सुचित्रा बांदेकरांच्या आई म्हणजेच आदेश बांदेकरांच्या सासूबाई नुकत्याच या मालिकेच्या सेटवर भेट देण्यासाठी पोहोचल्या होत्या. याचा खास व्हिडीओ प्राजक्ता गायकवाडने शेअर केला आहे. आजी सेटवर येताना माझ्यासाठी खास खाऊ घेऊन आल्या आहेत असं सांगत अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले आहेत. आलोकची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शुभंकर तावडेने सुद्धा त्यांचे आभार मानले आहेत.

प्राजक्ता गायकवाड म्हणते, “आमच्या सेटवर आज स्पेशल पाहुणे आलेत आणि त्या माझ्यासाठी खूप खाऊ घेऊन आल्या आहेत. सेटवर आलेल्या या खास पाहुण्या आहेत आमच्या आजी! सुचित्रा ताईला आम्ही सेटवर नेहमीच मिस करतो. आज सुचित्रा ताईंच्या मातोश्री आम्हाला भेटायला सेटवर आल्या आहेत. त्यांनी खरवस आणि सुतरफेणी आणलीये…आणि खरवस लगेच संपला सुद्धा…खरंतर, खरवस खास माझ्यासाठी आणला होता. पण, तो सगळ्यांनी खाल्ला आणि संपला. आजी! थँक्यू सो मच आजी तुम्ही मला भेटायला आलात आणि एवढा खाऊ घेऊन आलात. त्यांनी मला फोन केला होता आणि फोनवर बोलताना माझं कौतुक केलं होतं…त्यांच्याकडून कौतुक होणं, हीच माझ्या कामाची पोचपावती होती. त्यावेळी मी त्यांना सहज बोलले होते…आजी सेटवर याल तेव्हा खाऊ घेऊन या..तर, त्या आठवणीने खाऊ घेऊन आलेल्या आहेत. पुन्हा एकदा थँक्यू सो मच!”

प्राजक्ताने शेअर केलेल्या या गोड व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप छान ताई”, “प्राजक्ता ताई नेहमी सर्वांना आपलंसं करते”, “सेटवर सर्वांचं छान बॉण्डिंग आहे”, “आम्हाला तुमची मालिका खूप आवडते” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, प्राजक्ता गायकवाडची प्रमुख भूमिका असलेली ही ‘पाठराखीण’ मालिका दररोज रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.