Aadesh Bandekar Rply To Digamber Naik Statement : मराठी अभिनेते दिगंबर नाईक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रात्री पावणेबारा वाजता त्यांना एका मालिकेतून काढून टाकले गेल्याची आठवण सांगितली. स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्य’ या मालिकेतून त्यांना अचानक काढून टाकलं. यावेळी त्यांनी आदेश बांदेकर यांचे नावसुद्धा घेतले होते. त्यावर आता आदेश बांदेकरांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

मुलाखतीत दिगंबर नाईक यांनी, “आदेश बांदेकर मालवणीच आहे ना… माझा मित्रच आहे तो… रात्री पावणेबारा वाजता मला ज्या मालिकेतून काढलं, ती ‘लक्ष्य’ मालिका त्याचीच होती” असं म्हटलं होतं. तसेच “मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. नाहीतर मी कायम कामात व्यग्र राहिलो असतो” असेही ते स्पष्टपणे म्हणाले होते. त्यावर आता आदेश बांदेकरांनी व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

“जी व्यक्ती कधीच मालिकेत नव्हती, त्याला काढलं असं कसं म्हणता येईल”

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आदेश बांदेकर म्हणतात, “हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे. सुबुद्धी दे, आनंद दे. नुकतेच मी सोशल मीडियावर पाहिले की, ‘लक्ष्य’ मालिकेबद्दल कुणीतरी विधान केले आहे. एखाद्या मालिकेत त्या कलावंतांमध्ये जी व्यक्ती कधीच नव्हती, तर त्याला मालिकेतून काढलं, असं कसं म्हणता येईल. ‘मालवणी माणसाला मालवणी माणूस नको’, असं म्हणत असताना अतिशय नम्रपणे सांगावंसं वाटतं की, त्या मालिकेतल्या मुख्य पाच जणांपैकी एक मुख्य पोलिस म्हणजे कमलेश सावंत हे देवगडचे आणि मालवणीच आहेत. त्यांनी आपल्या अभिनयानं आपला ठसा उमटवला आहे. सध्या ते ‘दृश्यम’चे शूटिंग करत आहेत. असे कितीतरी मालवणी आहेत, जे इमानेइतबारे रंगभूमीची सेवा करत आहेत.”

“मी मालवणी निर्माता आहे, कुडाळचा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे”

त्यानंतर ते सांगतात, “सोहम प्रॉडक्शनच्या ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे होती, ती मालवणी नाही का? रागिणी सामंत… काय सुंदर मालवणी बोलतात. कारण- त्या मालवणी आहेत. ‘शाब्बास सूनबाई’मधल्या शकुंतला ताई नरेसुद्धा मालवणी आहेत. यादी काढायची झाली, तर अशी कितीतरी नावे आहेत. हो, मी मालवणी निर्माता आहे, मी कुडाळचा आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. कारण- सिंधुदुर्गमधून मुंबईत येऊन आई-वडिलांनी आमच्यावर उत्तम असे संस्कार केले आहेत. त्या मातीला कधी विसरता येणार नाही. जे केलं ते प्रामाणिकपणे केलं.”

मालिकेतून काढलं, याने घेतलं नाही, त्याने घेतलं नाही… हे सगळं कशाला?”

पुढे आदेश बांदेकर म्हणतात, “लक्ष्य मालिकेत जवळपास पाच हजारांहून अधिक लोकांनी काम केलं. त्यांची यादी काढायची झाली, तर अनेक कलावंत, तंत्रज्ञ मालवणी आहेत. पण मला वाटतं की, आपण महाराष्ट्रात राहतो. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण प्रत्येक भागाचा आणि प्रांताचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक कलावंत इथे येतात. मराठी रंगभूमीबरोबरच ते मनोरंजनाचे उत्तम काम करीत आहेत. मीसुद्धा इतकी वर्षं अत्यंत मेहनतीनं मनोरंजन क्षेत्राद्वारे सेवा करत आहे. त्यामुळे उगाच काहीतरी विधान करणे, मालवणी माणसाला मालवणी माणूस नको, मला या मालिकेतून काढलं, मला यानं घेतलं नाही आणि त्यानं घेतलं नाही… हे सगळं कशाला? त्यापेक्षा आपण काम करूया. आपल्या कामाचा ठसा उमटवूया. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या दशावतारी कलावंतांचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही कायमच प्रत्येकाचा आदर करतो. आमच्यावर ते संस्कार आहेत.”

दिगंबर नाईक यांच्या वक्तव्यावर आदेश बांदेकरांनी शेअर केला व्हिडीओ

“दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटे स्वत:कडे असतात हे विसरू नये”

व्हिडीओमध्ये ते शेवटी असं म्हणाले, “दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटं स्वत:कडे असतात हे कुणी विसरू नये. आत्मपरीक्षण करावं आणि मनोरंजनाच्या माध्यमात प्रामाणिकपणे सेवा करावी. बा रवळनाथा… सगळ्यांका सुबुद्धी दे रे… गणपती बाप्पा मोरया…” दरम्यान, या व्हिडीओत आदेश बांदेकरांनी दिगंबर नाईक यांचं नाव घेतलेलं नाही. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर काही कलाकार आणि नेटकऱ्यांनीसुद्धा आपली मतं व्यक्त केली आहेत.