महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर सध्या त्यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. येत्या काही दिवसांत ‘होम मिनिस्टर’चं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. होम मिनिस्टरचा प्रवास, घराघरांत फिरताना आलेले अनुभव तसेच बांदेकरांच्या घरात आलेल्या नव्या सुनबाईंविषयी सुद्धा या मुलाखतीत आदेश बांदेकरांनी सांगितलं.

आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकला. सोहमने ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्नगाठ बांधली. पूजा आणि सोहमची जोडी सुद्धा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. पूजा आमच्या घरची सून नसून, ती आमची मुलगीच आहे असं आदेश बांदेकरांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

पूजा ही माझी लाडाची मुलगी

आदेश बांदेकर म्हणतात, “मी सासरा कमी आणि बाबा जास्त झालो आहे. घरात मुलगी येण्याचा आनंद किती वेगळा असतो, हे आता नव्याने अनुभवतोय. आमच्या घरी सुचित्रा आली, तेव्हाही तसंच झालं होतं. आज पुन्हा तिच भावना अनुभवायला मिळतेय. प्रत्येक घरात मुलगी असावी…. कारण, तिच घरातल्या नात्यांना नवा अर्थ देते. पूजा ही माझी लाडाची मुलगी आहे.”

होम मिनिस्टर कार्यक्रमाबद्दल बोलताना ते म्हणाले, “मी अशा घरांमध्ये गेलो आहे, जिथे परिस्थिती अत्यंत बिकट असते. काही घरांमध्ये बसायला खुर्चीही नसते. एखादी माऊली स्वत:ची साडी गॅस सिलिंडरवर टाकून पाट ठेवून मला बसायला जागा करते. हे अनुभव फार वेगळे असतात. कार्यक्रमामुळे अशा माऊलींच्या घरी आम्ही त्या क्षणाला आनंद आणू शकतो, त्यांना मदत करू शकतो.”

दरम्यान, आदेश बांदेकरांचं संपूर्ण कुटुंब यंदा वारीत सहभागी झालं होतं. यावेळी अभिनेते सुनेबद्दल म्हणाले होते, “पूजा गेल्यावर्षी तू पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झाली होतीस…त्यावेळेला खरंतर तू लक्ष्मीच्या पाऊलांनी आमच्या घरात येणार हे ‘ठरलं तर मग’ जणू काही झालेलं होतं…. फक्त ते घरोघरी पोहोचलं नव्हतं. पण, तू जेव्हा आमच्या कुटुंबात आलीस…तेव्हा आनंदाचं एक नवीन पर्व आता सुरू झालं आहे.”

पूजा बिरारी व सोहम बांदेकर यांचा विवाहसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत पार पडलं होतं. या सोहळ्याला कलाकारांसह राजकीय वर्तुळातील मान्यवरांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.