scorecardresearch

“ठाण्यात घोडबंदर रोडला…” ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर पोहोचण्यासाठी कलाकारांना होतोय प्रचंड त्रास, पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

milind gawali
मिलिंद गवळी

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांच्या यादीतील एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. ही मालिका कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेत येणारे विविध ट्वीस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतंच एक तक्रार केली आहे. त्यांनी मालिकेच्या सेटपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांना किती त्रास सहन करावा लागतो? याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते एका छान निसर्गरम्य ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्यांनी या पोस्टला एक कॅप्शन दिले आहे. त्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा : “…म्हणून लोक आजारी पडत असतील का?” मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“आई कुठे काय करते‘ मालिकेच्या शूटिंग साठी ठाण्यामध्ये शिफ्ट झालो,
ओवळ्याला आमचा सेट आहे, अगदी डोंगराच्या पायथ्याशी आहे, मागच्या बाजूला डोंगर आहे, पानखंडा गावामध्ये ही जागा आहे, छोटसं गाव आहे ,गावातली माणसं खूप शांत प्रेमळ आहेत, दोन-तीन वेळा त्या गावात जाण्याचा योग आला, छोटेसे एक मंदिर आहे पाण्याचा झरा आहे, पण या सेटवर पोहोचण्यासाठी अंधेरी वरून मला अडीच तास गाडीने लागतात, त्यात दहिसर चेक नाक्यापासून त्या फाउंटन पर्यंतचा रस्ता म्हणजे, एक कसरतच असते, सतत ट्राफिक जाम, त्या रस्त्यात इतके मोठे खड्डे असतात, की आमच्या सेटवर मोटरसायकली ने येणारे बरेच लोक त्यात पडून त्यांना दुखापत झाली आहे, समीर म्हात्रे आणि बाबा श्रीवास्तव खूप मार लागला होता.

Risky आहे दुचाकी वाल्यांसाठी खूपच रिस्की आहे,
हा असा प्रवास टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्या साठी मी ठाण्यात शिफ्ट झालो, घोडबंदर रोड ला सेट जवळच घर घेतलं,
तिथे सगळं छान आहे पण ध्वनी प्रदूषण चा major issue आहे, मोठमोठे टँकर ट्रेलर्स गाड्या सतत धावत असतात, ऑन वाजवत असतात, अगदी बिल्डिंग समोर एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यातून प्रत्येक गाडी जाताना एक कर्कश आवाज होतो,
खरंतर या तीन वर्षांमध्ये मला आता त्या आवाजाची सवय झाली आहे, meditation मुळे मला तो आवाजच ऐकू येत नाही , म्हणजे कानात जातो पण डोक्यात जात नाही,
पण खरंतर मला असं वाटतं की मला तो आवाज ऐकू येत नाही,
कदाचित विमानतळाच्या बाजूला राहणारे किंवा रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहणारे त्यांना त्या रेल्वेच्या विमानाच्या आवाजाचा त्रास होणे बंद होतं, तसंच मला तो त्रास होत नाही.
पण कधी सुट्टी मध्ये डोंगर दर्यात हिंडायला गेलं, आणि तिथली शांतता अनुभवली, की काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं,

अशोक नायगावकर एकदा गंमतीने गोष्ट सांगत होते
“एका माणूस एकदा स्वच्छ हवेच्या ठिकाणी गेला , जाऊन आल्यावर आजारी पडला,
डॉक्टरांनी त्याला विचारलं की कुठे गेला होतास,
डॉक्टरांना म्हणाला स्वच्छ हवेत निसर्गाच्या सानिध्यात गेलो होतो, डॉक्टर म्हणाले की बरोबर आहे , तुम्हाला स्वच्छ हवेची सवय नाहीये, थोडा गाड्यांचा धूर तू घे , मग बरं वाटेल तूला”
माझं सुद्धा अगदी तसंच झालं आहे बहुतेक , मी परत डोंगरातून आलो आणि त्या खड्ड्यात तून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज ऐकला आणि मग मन शांत झालं.

पण गंभीरपणे आपण सर्व प्रकारचे प्रदूषण टाळले पाहिजे.
आपल्या पुढच्या पिढीसाठी एक सुरक्षित जग बनवूया”, असे मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “तो पैशांसाठी गेला…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाने ओंकार भोजनेच्या एक्झिटवर मांडलेले मत

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 19:01 IST