Marathi Actress Shares Marriage Date : गेल्या काही दिवसांत सूरज चव्हाण, पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड, निमिष कुलकर्णी, तेजस्विनी लोणारी, भाग्यश्री न्हालवे, शुभांगी सदावर्ते, स्वानंद केतकर, मेघन जाधव-अनुष्का पिंपुटकर या कलाकारांनी लग्नगाठ बांधली. अशातच आता यात लवकरच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव सामील होणार आहे.

ही अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णी. गौरी पुढच्या वर्षी लग्न करणार असून याबद्दल तिनं स्वत:च खुलासा केला आहे. गौरीनं याआधी अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र, ‘आई कुठे काय करते’ने तिला अधिक लोकप्रियता मिळाली.

गौरी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसंच गौरी सोशल मीडियावर तिचे अनेक डेली ब्लॉगही शेअर करताना दिसते. गौरीच्या या व्हिडीओमधून तिचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतो. याच मजेशीर अंदाजात तिनं चाहत्याच्या लग्नाविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

गौरीनं इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्यांनं तिला लग्न कधी करतेस? असं विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देत थेट तिच्या लग्नाची तारीखच सांगून टाकली. गौरीनं ५ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

अर्थात गौरीनं चाहत्याच्या प्रश्नाचं खोटं उत्तर दिलं आहे. तिनं प्रश्न विचारताना म्हटलं की, ‘मला काहीही विचारा; मी खोटं बोलेन’. त्यामुळे तिनं चाहत्याच्या प्रश्नाचं खोटं उत्तर दिलं आहे. दरम्यान, याआधीही तिला एका चाहत्यानं लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हाही तिनं “आहे पण आणि नाही पण…” असं उत्तर दिलं होतं.

गौरी कुलकर्णी इन्स्टाग्राम स्टोरी
गौरी कुलकर्णी इन्स्टाग्राम स्टोरी

स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’मध्ये गौरीनं यशच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. यासह ती आणखी काही इतर मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.