Apurva Gore & Anshuman Joshi Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत साक्षी महाजन, ज्ञानदा रामतीर्थकर, रेवती लेले अशा अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेने तिचं लग्न ठरल्याची गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली होती.
अपूर्वाने नुकतेच ‘चाफा आणि तो…मला खूप आवडतात’ असं कॅप्शन देत होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या ‘अहों’चा चेहरा रिव्हिल केला नव्हता. होणाऱ्या नवऱ्याची ओळख अपूर्वाने गुलदस्त्यात ठेवली होती. त्यामुळे तिचा जोडीदार नेमका कोण आहे याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
आज अखेर अपूर्वा गोरेने फॅमिली फोटो शेअर करत आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख चाहत्यांना करून दिली आहे.
अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच लोकप्रिय अभिनेता अंशुमन जोशीबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. अंशुमनने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ या गाजलेल्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. अंशुमन अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, चित्रलेखक आणि छायाचित्रकार म्हणून ओळखला जातो.
अंशुमनबरोबर फोटो शेअर करत अपूर्वा लिहिते, “आनंदघन येई घरा…तुम्हाला सर्वांना ओळख करून देते हा आहे गोरेंचा जावई आणि मी आहे जोश्यांची सून. आम्हाला जोडून ठेवणारं, आमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारं कुटुंब आम्हाला भेटलंय आणि यासाठी आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो.”
अपूर्वाचे आई-बाबा, अंशुमनचे आई-बाबा… गोरे आणि जोशी या दोन्ही कुटुंबाची झलक अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. अपूर्वाने शेअर केलेल्या पोस्टवर ऐश्वर्या नारकर, दिपाली पानसरे, अश्विनी कासार या मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अपूर्वाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकात काम करतेय. यामध्ये तिच्यासह ऐश्वर्या व अविनाश नारकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. याशिवाय ‘आई कुठे काय करते’ या सुपरहिट मालिकेत अपूर्वाने ईशा ही अरुंधतीच्या धाकट्या मुलीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

