‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. या मालिकेतील तिची अरुंधती ही भूमिका चांगलीच गाजली. जवळपास पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेच्या निरोपानंतरही अनेक चाहते मधुराणीच्या भूमिकेची आठवण काढत असतात. आपल्या अभिनयाने आणि भूमिकेमुळे चर्चेत राहणारी मधुराणी तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठीही तितकीच ओळखली जाते.

अशातच मधुराणीने लग्नाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत मधुराणी असं म्हणाली, “संघर्ष हा पुरुषांनाही असतो, मी तो नाकारत नाही. पितृसत्ताक समाजरचेनत तेही एक बळीच आहेत. कारण यात त्यांनाही विशिष्ट गोष्टीची पुरवायला लागतात. इतकंच कमावलं पाहिजे, घर घेतलं पाहिजे किंवा अमुक वयात गाडी घेतली पाहिजे वगैरे वगैरे…”

यानंतर मधुराणी असं म्हणाली, “पण स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वत:च्या मतांसाठी झगडावं लागतं. माझं इतकंच म्हणणं आहे आणि त्याचा आदर ठेवा. लग्न हे शेवटी राजकारणच आहे. तो एक सत्तेचा खेळ आहे. तो खेळ जोपर्यंत चाललाय तोपर्यंत सगळं छान आहे. आता काही पुरुष जे स्वतःला पुढारलेले म्हणवतात, ते असं म्हणतात की, बघ मी तुला पाठिंबा दिला. मी तुला नोकरीवर जायला दिलं. मी तुला परवानगी दिली. पण एक मिनिट; तू कोण आहेस?”

यापुढे मधुराणी असं म्हणते, “हे सगळं एका पिढीने स्वीकारलं आहे. माझा नवरा मला कायम पाठिंबा देतो. तो मला कधीही नाही म्हणत नाही. एक मिनिट… तो नाही म्हणणारा कोण आहे? तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्यायचा आहे आणि तुझा पाठिंबा त्याने वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या गृहीत धरला आहे. म्हणून तू करत आहेस. हे तुझ्याही गावी नाहीय आणि त्याच्याही गावी नाहीय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे ती म्हणाली, “मी तिला करु दिलं असं त्याला वाटत असतं आणि स्त्रियांना वाटत असतं आपण फार भारी. कारण त्यांना तेवढंच माहीत असतं. पण आता परिस्थिती बदलत आहे आणि ती बदलायला हवी. या पिढीकडून मला ती अपेक्षा आहे. तुला काय वाटतं? तुझा आनंद कशात आहे? असं तिला कधी कोणी विचारतच नाही.”