Gauri Kulkarni Talks About Her Marriage : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचं अभिनय क्षेत्रात कोणीही ओळखीचं नसताना त्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गौरी कुलकर्णी. परंतु, तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मुंबईत एकटीनं राहणं आणि त्याचबरोबर काम मिळवणं सोपं नसल्याचं तिनं म्हटलं आहे.

गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती सोशल मीडियामार्फत तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीनं अशातच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत कंटेंट क्रिएशन, मुंबईत एकटं राहणं, लग्न या सगळ्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिनं तिचा हा प्रवास कसा सुरू आहे आणि लग्नाबद्दल काय मत आहे याबद्दही सांगितलं आहे.

मुलाखतीत गौरी म्हणाली, “पुण्यात नोकरी करत असताना मी ‘आई कुठे काय करते’साठी ऑडिशन दिलेली. त्यानंतर माझी निवड झाल्यानंतर मी सुरुवातीचे दोन महिने पुण्याहून मुंबईला यायची आणि पुन्हा शूटिंग संपलं की, पुण्याला जायची. तिथे मी नोकरी करत होती. परंतु, कंपनीतील मॅनेजरनं मला एक दिवस, ‘तू कधीही येतेस आणि जातेस’, असं म्हणत ‘नोकरी सोड’ , असं म्हटलेलं. त्यामुळे मी नोकरी सोडली”. तेव्हापासून ती पूर्णपणे या क्षेत्रात काम करत असून, हेच तिचं ब्रेड अँड बटर असल्याचं सांगितलं आहे. यावेळी ती म्हणाली, “मी इथे एकटी राहते आणि माझे आई-बाबा बीडमध्ये राहतात. घरात एकटीनं राहणं अवघड असतं. काही वेळेला आपल्याला कोणीतरी आजुबाजूला हवं, असं वाटत असतं. कधी कधी खूप कठीण परिस्थितीतून जावं लागतं. खचून गेल्यासारखं होतं. ब्रेकडाऊन होतो.”

हल्ली अनेक कलाकार सोशल मीडियामुळे मिळणारे पैसे, प्रसिद्धीमुळे मालिका, चित्रपटांत काम करता करता सोशल मीडियावरही कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत असतात. गौरीसुद्धा वेगवेगळ्या रील्स व्हिडीओ करत असते. यावेळी ती अनेकदा काही ब्रँडच्या जाहिरातीही करते, ज्यामुळे तिला चांगले पैसे मिळतात. परंतु, सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणं अजिबात सोपं नसल्याचं तिनं म्हटलं आहे.

गौरी लग्नाबद्दल म्हणाली, “आधी लग्न करायचं की नाही याबद्दल मी निर्णय घेतला नव्हता; पण आता मला लग्न करायचं आहे. एकटी राहायला लागल्यानंतरच हे माझ्या लक्षात आलं आहे की, मला हवंय कोणीतरी. पण असं नाहीये की, मी एकटी राहू शकत नाही म्हणून मला जोडीदार हवाय. आता मला लग्न करावंसं वाटत आहे एवढंच. जर कोणी चांगला मुलगा भेटला. आम्ही एकमेकांशी जुळवून घेऊ शकत असू, तर मला आवडेल लग्न करायला. पण असं नाहीये की, वय वाढतंय वगैरे तर लग्न करायचं आहे. जर कोणी आयुष्यात आलं आणि आम्हाला आम्ही एकमेकांसाठी योग्य वाटलो, तर करणार लग्न.” लग्नाबद्दल गौरी पुढे म्हणाली, “मी लग्न केलं तरी मी अजिबातच मोठं लग्न करणार नाहीये. मला काही अनुभव आले. त्यातले काही खूप चांगले आहेत. पण, काहींच्या बाबतीस असं झालं की, मी त्यांच्यासाठी खूप केलं आहे; पण मला गरज होती तेव्हा ते नव्हते.”