scorecardresearch

“मुंबईत रस्ता क्रॉस करताना…” आयुष्यातल्या ‘त्या’ खास व्यक्तीसाठी मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट

इन्स्टाग्रामवर मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केलेली ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

“मुंबईत रस्ता क्रॉस करताना…” आयुष्यातल्या ‘त्या’ खास व्यक्तीसाठी मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट
मधुराणी प्रभुलकर यांनी ही पोस्ट त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी लिहिली आहे. (फोटो सौजन्य- मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत.त्या सोशल मीडियावरही बऱ्याच सक्रिय असतात.या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात आणि अनेकदा रोजच्या आयुष्यातील घडामोडी त्या चाहत्यांशी याच माध्यमातून शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी शेअर केलेली पोस्ट बरीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी ही पोस्ट त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी लिहिली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांना अलिकडेच संस्कृती कलादर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत ‘कलादर्पण’ पुरस्कार सोहळ्यात मधुराणी प्रभुलकर यांना ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यातले काही फोटो शेअर करत त्यांनी ही खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा- मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्या युजरला ‘अरुंधती’चं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मराठी परंपरेचा पुळका…”

मधुराणी प्रभुलकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “संस्कृती कलादर्पण’ पुरस्काराला मी नेसलेल्या ह्या साडीचे खूपच कौतुक झाले. त्यानिमित्ताने ही पोस्ट. ही सुंदर साडी मला माझ्या ‘प्रज्ञा अवसारमोल’ ह्या दिव्यांग मैत्रिणीने तिच्या पहिल्या पगारातून गिफ्ट केलीये. एकदा मुंबईत रस्ता क्रॉस करून देताना तिची माझी ओळख झाली आणि आम्ही संपर्कात राहिलो. ती आता आमच्या घरातलीच आहे. स्वरालीशी सुद्धा तिची छान गट्टी आहे.”

त्या पुढे लिहितात, “बुलढाण्याच्या हिनी अतिशय जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत तिचं शिक्षण पूर्ण केलंय. आता ती एका बॅंकेत छान जॉब करते. अलिकडेच तिचं लग्नही झालं. छान संसार करतेय. खूप अभिमान वाटतो आम्हाला तिचा आणि आपण किती छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो अशी लाजही वाटते कधी कधी. तिने मला खरंतर तसं कधीच ‘बघितलेलं’ नाही. पण मला ही साडी इतकी आवडेल, ती माझ्यावर इतकी खुलून दिसेल हे कसं कळलं असेल तिला…! काय म्हणायचं तिच्या ह्या ‘दृष्टीला’!” मधुराणी यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत असून अनेक मराठी सेलिब्रेटींनी यावर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- “पुन्हा एकदा सर्जरी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर यांचा व्हिडीओ चर्चेत

दरम्यान मधुराणी प्रभुलकर ‘आई कुठे काय करते’ मालिकेत साकारत असलेली ‘अरुंधती’ ही भूमिका सध्या बरीच गाजतेय. मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर आहे. काही दिवसांपूर्वीच मधुराणी यांनी त्यांना झालेल्या आजाराची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली. गालावर झालेली शस्त्रक्रिया आणि त्यादरम्यान मालिकेचं शूट या सगळ्या गोष्टींवर त्या एका व्हिडीओच्या माध्यमातून बोलल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 10:00 IST

संबंधित बातम्या