Aai Kuthe Kay Karte Fame Actress Apurva Gore : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं आहे. रेवती लेले, गायत्री दातार, साक्षी महाजन, ज्ञानदा रामतीर्थकर या अभिनेत्रींची सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या पाठोपाठ आता छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अपूर्वा गोरे.

‘स्टार प्रवाह’वर सुपरहिट ठरलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या पात्राचं नाव होतं ईशा; जी अरुंधतीची धाकटी मुलगी असते. तिने साकारलेली ईशाची भूमिका घराघरांत प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बोहल्यावर चढणार आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या पतीसह फोटो शेअर करत अपूर्वाने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

हिरव्या रंगाची साडी, गळ्यात नाजूक ठुशी अन् हातात गुलाबाचं फूल घेऊन अपूर्वाने होणाऱ्या पतीसह हटके फोटोशूट केलं आहे. “ठरलं! चाफा आणि तो… मला खूप आवडतात…” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

मात्र, या सगळ्या फोटोंमध्ये अपूर्वाने तिच्या होणाऱ्या पतीचा फेस रिव्हिल केलेला नाहीये, त्याची ओळख अभिनेत्रीने गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे अपूर्वाच्या आयुष्यातील ‘तो’ नेमका कोण आहे याचा विचार तिचे चाहते करत आहेत.

या पोस्टवर कमेंट्स करत सुकन्या मोने, अश्विनी महांगडे, शुभंकर एकबोटे, ऐश्वर्या शेटे, अदिती द्रविड या कलाकारांनी अपूर्वाला तिच्या भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सुद्धा या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता अपूर्वा लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

आता अपूर्वाचा ‘तो’ नेमका कोण आहे हे अभिनेत्री सर्वांसमोर रिव्हिल केव्हा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्यासह ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात काम करतेय.