Punam Chandorkar Shared Her bad experience : मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना करिअरच्या सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना वेगळे अनुभव आले. अनेकदा कलाकार मंडळी याबद्दल सांगत असतात. अशातच आता ‘आई कुठे काय करते’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूनम चांदोरकरनेसुद्धा तिला सुरुवातीला आलेला अनुभव सांगितला आहे.
पूनम चांदोरकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आहे. ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ते ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे. यामध्ये तिने विशाखा हे पात्र साकारलेलं. तिच्या या भूमिकेला अनेकांची पसंती मिळाली. पण, तिने यापूर्वीसुद्धा काही कलाकृतींमध्ये काम केलं आहे. अशातच आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या एका मालिकेच्या सेटवरील अनुभव सांगितला आहे जो तिच्यासाठी त्रासदायक ठरल्याचं तिने म्हटलं आहे.
खूप वाईट अनुभव आला – पूनम चांदोरकर
मुलाखतीत तिने मालिकेचं नाव न घेता श्वेता पेंडसे व मृणाल दुसानिस या अभिनेत्री असेलेल्या तिची पहिली मालिका असं म्हटलं आहे. अभिनेत्रीला इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या दिवसांचा अनुभव विचारल्यानंतर ती म्हणाली, “जेव्हा मी दूरदर्शन करायला लागले तेव्हा श्वेता पेंडसे, मृणाल दुसानिस यांची एक मालिका होती. ती माझी पहिली मालिका होती. मी आता त्या मालिकेचं नाव घेत नाही पण, त्यात मला ऑफिसमधील मुलीचा रोल होता. तो रोल चांगला आहे, तुझ्या तारखा सांभाळून घेऊ असं सांगण्यात आलेलं. पण, तिथे मला खूप वाईट अनुभव आला. मला तेव्हा इंडस्ट्री कशी आहे याबद्दल माहिती नव्हती.” श्वेता पेंडसे व मृणाल यांनी ‘कलर्स मराठी’वरील ‘असं सासर सुरेख बाई’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.
पूनम याबद्दल पुढे म्हणाली, “माझ्यात संयम कमी होता. सकाळी बोलावलं असेल आणि संध्याकाळी सीन लागला तर चिडचिड व्हायची. पण, अशावेळी आपल्या सहकलाकारांकडून कळतं की आपण एकदा दिवस दिला की दिला मग आपण शांत राहायचं. तिथे बऱ्याच गोष्टी मला खटकल्या. माझ्या दूरदर्शनच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हत्या. अचानक न सांगता मालिकेतून रिप्लेस करण्यात आलं. अशा काही गोष्टी पण घडल्या. त्यामुळे मला इंडस्ट्रीत अशीच वागणूक मिळते का हा प्रश्न पडला. पण, पुढे जाहिरातीत काम करायला सुरवात केली तेव्हा माझा अनुभव खूपच चांगला होता. तिथे आदर दिला जातो, चांगले पैसे मिळतात.”
दरम्यान, पूनमने आतापर्यंत मालिका, नाटक आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. यासह ती निवेदिकासुद्धा आहे. पूनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनाबद्दलच्या घडामोडी शेअर करत असते.
