मुंबई - ठाण्यासारख्या मोठ्या शहरात आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. २०२४ मध्ये मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी आपलं स्वप्न साकार करत गेल्या काही दिवसांत नव्या घरात प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या संजनाने ठाण्यात आलिशान घर घेऊन आपली स्वप्नपूर्ती केली आहे. रुपालीने सुरुवातीच्या काळात संघर्ष करून आज एवढं मोठं यश मिळवलं आहे. गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यामुळे रुपाली आज छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठीसह हिंदी मालिकांमध्येही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'बिग बॉस'मराठी नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. शो संपल्यावर पुढे थोड्याच दिवसात अभिनेत्रीने 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाच्या रुपात एन्ट्री घेतली. आज घराघरांत रुपालीला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. याच प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाच्या जोरावर आणि कुटुंबाच्या साथीने अभिनेत्रीने आपली स्वप्नपूर्ती केली आहे. हेही वाचा : Mirzapur 3 : ‘त्रिपाठी, पंडित ते गुप्ता’, ‘या’ ६ कुटुंबांभोवती फिरतंय ‘मिर्झापूर’चं राजकारण! कालीन भैय्या की गुड्डू, कोण मारणार बाजी? रुपालीने आपल्या नव्या घराची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर करत इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. रुपाली भोसलेची पोस्ट या जगाच्या पाठीवर कुठे का होईना आपलं स्वतः चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत असं म्हणतात पण, एक वेळ अशी येते जेव्हा नियतीच तुमचं पाकीट मारते आणि हे स्वप्न बघायला सुद्धा तुमचं मन धजावत नाही. लहानपणी निसर्ग चित्रातील त्रिकोणी व आयताकृती घर काढताना आपण ज्या स्टेप्समध्ये घर काढतो. त्या स्टेप्समध्येच माझं घर पूर्ण होत गेलं फक्त त्या वेगवेगळ्या स्टेप्स म्हणजे माझ्या आयुष्यातली वेगवेगळी घरं होती. कोऱ्या कागदावर काहीच न काढलेली स्टेप सुद्धा माझ्यासाठी एका वेळेस घर होतं कारण, तेव्हा आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो. आयुष्यातलं ते पान नवीन आणि कोरं होतं पण, पेन्सिलीने चित्र काढण्याची धमक शाबूत होती. त्यानंतर चित्र काढताना आधी आपण केवळ आयताकृती भिंती काढतो, ते सुद्धा एका टप्प्यावरचं माझं घर होतं कारण तेव्हा आम्ही सगळे गोठ्यात राहात होतो. केवळ भिंती…छप्पर असं काहीच नव्हतं…हां शेणाने सारवलेलं अंगण मात्र तेव्हा होतं आमच्याकडे मग पुढे चित्रामध्ये त्रिकोणी, कौलारू छत काढलं आणि आम्हाला पत्र्याचं का होईना घर मिळालं…आयुष्य इतक्या ठिकाणी उसवलेलं की, त्यापुढे त्या पत्र्यांना असलेल्या भोकांचं एवढं काही वाटायचं नाही…फक्त कोणी त्यातून आपल्याला बघू नये म्हणून पहाटे साडेतीनला उठून आंघोळ करावी लागायची. पुढे परिस्थिती थोडी बरी झाल्यावर भाड्याची सतराशे साठ घरं बदलली… त्या सगळ्या प्रवासात अनेकदा या चित्र असलेल्या कागदाचा चोळामोळा करून, फाडून फेकून द्यावा वाटला. स्वतःचं घर असावं हे स्वप्नच चुकीचं आहे असं वाटायला लागलं…पण, स्वप्न दाखवणाऱ्याला खचून चालत नाही. कारण, त्याच्याकडे बघणारे अनेक जण असतात. त्यामुळे मान खाली घालून अथक मेहनत करत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याकडे नसतो. मागची अनेक वर्षे काम करत खाली घातलेली मान मी जेव्हा काही दिवसांपूर्वी वर उंचावून पाहिली आणि लक्षात आलं… अरेच्चा चित्र पूर्ण झालं की आपलं… परमेश्वराचे, आई-वडिलांचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्सच्या सदिच्छा यांमुळे मी या नवीन घरात आई, बाबा आणि संकेतबरोबर प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झालं आहे. मनापासून धन्यवाद आणि आता वेळ आहे पूर्ण झालेल्या चित्रामध्ये मनसोक्त रंग भरण्याची… मग ते रंग सांडून बॉर्डरच्या, कागदाच्या बाहेर गेले तरी किसको है फिकर.. हेही वाचा : भारतीय संघाचा विजयोत्सव पाहून शाहरुख खान झाला थक्क! विराट अन् रोहितचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला… दरम्यान, पृथ्वीक प्रताप, गौर कुलकर्णी, अभिजीत केळकर यांसह बरेच मराठी कलाकार रुपालीच्या घरच्या गृहप्रवेश समारंभाला उपस्थित होते. सध्या मराठी कलाविश्वातून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.