छोट्या पडद्यारील काही गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. तब्बल पाच वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने निरोप घेतला. मालिका संपली असली तरी, मालिकेतील कलाकार मात्र एकमेकांना अधूनमधून भेटत असतात. याचे खास क्षणही ते शेअर करताना दिसतात.

अशातच मालिकेतल्या अभिषेक देशमुख म्हणजेच निरंजन कुलकर्णी अन् आप्पा म्हणजेच किशोर महाबोले यांची अचानक भेट झाली आहे. या भेटीचा खास व्हिडीओ निरंजनने त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

निरंजन हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. तसेच तो विविध ठिकाणांना भेटीसुद्धा देतो, याचे खास क्षणसुद्धा तो आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतो. अशातच त्याने ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आप्पा म्हणजेच किशोर महाबोले यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये निरंजन “मी आता शूटिंग करून ठाण्यात आलो आणि मला सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व जॉगिंग करताना दिसले”, असं म्हणतो. पुढे तो कॅमेरा किशोर महाबोले यांच्याकडे नेतो. या भेटीनंतरच्या खास भावनासुद्धा निरंजनने व्यक्त केल्या आहेत.

व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये तो लिहितो, “आप्पा… आपल्या सगळ्यांचे आवडते आप्पा… ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपून एक वर्ष उलटून गेलं. पण आपल्या या आप्पांची एनर्जी, उत्साह अजूनही तसाच आहे. आप्पा आज तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. तुमच्याकडून नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमच्यामुळे माझा आजचा दिवस फारच आनंददायी आणि उत्साहवर्धक झाला. खूप खूप धन्यवाद. असेच भेटत रहा.”

निरंजनने शेअर केलेल्या या व्हिडीओवर मालिकेतल्या कलाकारांनीसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच अनेक चाहत्यांनीसुद्धा अभिषेक आणि आप्पा यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मालिकेतली अभिनेत्री सीमा घोगळे हिने गे बाय मांजे….आप्पानू अशी तिच्या खास शैलीत कमेंट केली आहे. तर अदिती द्रविडनेसुद्धा “माझे आवडते” अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर मालिकेच्या अनेक चाहत्यांनी तुमची खूप आठवण येत आहे. पुन्हा नवीन प्रोजेक्टमधून एकत्र या” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, निरंजन ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर स्टार प्रवाहवरीलच ‘वचन दिले तू मला’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच या मालिकेत ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध देशमुख म्हणजेच मिलिंद गवळीसुद्धा आहेत.