Aarti Solanki on Digambar Naik and her one sided love story: आरती सोलंकी तिच्या विविध भूमिकांसाठी ओळखली जाते. तसेच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअरमधील अनेक खास गोष्टींबद्दल वक्तव्य केले आहे.
‘अभिजात मराठी फिल्मी’ला आरती सोलंकीने मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने दिगंबर नाईक यांच्याबद्दल वक्तव्य केले. ‘फू बाई फू’मध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. अभिनेत्री म्हणाली, “दिगंबरबरोबर माझ्या खूप चांगल्या आणि गोड आठवणी आहेत. तसं बघायला गेलं, तर आमची खूप भांडणं व्हायची.”
आरती म्हणाली, “आता भेटल्यानंतरही आम्ही भांडातो. आम्ही सेटवर जायचो, आमचं-आमचं काम करायचो आणि निघून जायचो. आम्हाला कार्यक्रमाच्या सुपाऱ्यादेखील मिळाल्या. सगळ्यात जास्त कार्यक्रम आमच्या जोडीनं केले आहेत. आम्हाला त्यावेळी खूप जण बोलवायचे. तर लोकांना वाटायचं की, त्याचं आणि माझं लफडं आहे. आमचं काम बघून इंडस्ट्रीमधील अनेकांना तसं वाटतं होतं.”
“दिगंबरला घाम फुटला होता”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “एक तर किस्सा असा आहे की, जिथे दिगंबरला घाम फुटला होता. मी आणि दिगंबर शिर्डीच्या पुढे एका कार्यक्रमासाठी जात होतो. तर त्याच्या सगळीकडे ओळखी आहेत. तो म्हणाला जाता-जाता शिर्डीला जाऊयात. मग आम्ही गेलो. त्यावेळी लोक आम्हाला ओळखत होते. तर आम्ही जाण्याआधी साईबाबांच्या समाधीवरती गुच्छ आणि हार होते. कुठलं तरी जोडपं आलं असेल. त्यांनी ते हार वगैरे ठेवले असतील. तर आम्ही गेल्यानंतर गुरुजींनी आम्हाला ते गुच्छ आणि हार दिले. ते घेऊन आम्ही बाहेर पडलो. तिथे एक कुटुंब होतं. ते १०-१२ जण होते. आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवल्या. ते म्हणाले की, आम्हाला माहीत होतं की तुमचं लग्न होणार. ते ऐकून दिगंबरला घाम फुटला होता. आम्ही त्यांना असं काही नाही, असं सांगितलं. त्यावेळी दिगंबर विवाहित होता. त्याला मुलं होती.”
आरती आणखी एक किस्सा सांगत म्हणाली, “मी ‘लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती’ मालिकेत काम करीत होते. संजीवनी जाधव व मी त्या मालिकेत होतो. तिनंही मला एकदा विचारलं होतं. तिचं आणि माझं खूप खास नातं आहे. तर तिनं मला दिगंबरबद्दल विचारल्यानंतर मी तिला म्हणाले होते की, मी आता त्याला फोन केला, तर तो माझा फोन उचलणार नाही. आम्ही फक्त कामापुरतंच बोलतो. आताही आम्ही फक्त कामापुरतंच बोलतो”, असे म्हणत अभिनेत्रीने दिगंबर नाईक व तिच्याबद्दल लोकांना गैरसमज असल्याचे वक्तव्य केले.
“माझं कोणावर तरी १३ वर्षांपासून फार प्रेम..”
त्याच मुलाखतीत तिला विचारले गेले की, अशी कोणती गोष्ट आहे, जी तुला खुलेपणाने बोलायची होती; पण तू आतापर्यंत बोलू शकली नाहीस. त्यावर आरती म्हणाली, “माझं कोणावर तरी १३ वर्षांपासून फार प्रेम आहे. तिथे मी फार बोलू शकले नाही. कारण- काही होऊ शकत नाही.” एकतर्फी प्रेम आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, एकतर्फी प्रेम आहे. इंडस्ट्रीतील आहे”, असे म्हणत अभिनेत्रीने ती कोणाच्या तरी प्रेमात असल्याचे सांगितले.
दरम्यान, आगामी काळात अभिनेत्री विविध प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
