Aarti Solanki Viral Post: सध्या आमने-सामने नाटक, नाटकातील कलाकार आणि निर्माते या सगळ्याचीच बरीच चर्चा होत आहे. रोहन गुजर व केतकी पालव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि चर्चांना उधाण आलं.

“मला अजिबातच वाईट वाटलं नाही”

आता या प्रकरणावर अनेक व्यक्त झाले आहेत. काहींनी कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंचा या संबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यानंतर अभिनेत्री आरती सोळंकीची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

एक पोस्ट शेअर करत तिने लिहिले, “माझं मस्त आहे, मला नाटकातून काढून टाकलं तर मला अजिबातच वाईट वाटलं नाही. उलट, मीच निर्मात्यांना सांगितलं की माझ्याकडून सगळ्यांना पार्टी. कारण- त्या नाटकामुळे माझा काही ऑस्कर गेला नाही आणि वेळ ठरवते की कोणाचं चांगलं झालं.”

ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, “वेळ ठरवते की कोणाचं भलं कधी होणार, तुमच्या हातात काहीच नसतं.”

आरतीच्या पोस्टवर अंकिता वालावलकरने लिहिले, “तू डेंजर आहेस”, असे लिहित तिने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. एकाने लिहिले, “हा आत्मविश्वास पाहिजे, तू कमाल आहेस”, आणखी एकाने लिहिले, “कितीही वाईट परिस्थिती असली तरी तू नेहमी सकारात्मक असतेस”, आणखी एकाने लिहिले, “एक दार बंद झाले ना, देव दुसरे उघडे करतो”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

सुरुवातीला रोहन व केतकी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी खुलासा केला की आमने सामने नाटकात ते दिसणार नाहीत. ते म्हणाले की, आमने सामने नाटकात आम्ही पुन्हा दिसणार नाही असं सांगितलं. १८ ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरला नाटक झाल्यानंतर जी मीटिंग झाली, त्यावेळी आम्हाला तुमचा शेवटचा प्रयोग होता, असं सांगण्यात आलं. तसंच, मानधनाच्या मुद्द्यावरून आम्ही वेगळो झालो असंही ते म्हणाले.

यानंतर आमने सामने नाटकाचे निर्माते लीना भागवत व मंगेश कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यांनी सांगितलं की मानधन वाढवून मागितलं म्हणून तडकाफडकी काढून टाकलं अशा आशयाचा सूर आधीच्या सहकलाकारांचा होता. यात एक शब्द राहून गेलाय, तो म्हणजे तिसऱ्यांदा मानधन वाढवून मागितलंय.

लीना भागवत व मंगेश कदम यांच्या व्हिडीओनंतर रोहन व केतकी यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, नाण्याची दुसरी बाजू आम्ही ऐकली पण ती बाजू मांडत असताना अनावधानाने, चुकून, सोयीस्कररित्या, मुद्दामून काही मुद्दे आले नाहीत. ते मांडण्यासाठी म्हणून आम्ही हा व्हिडीओ करतोय. यानंतर आम्हालासुद्धा अशा कुठल्याही प्रकारचा व्हिडीओ करण्याची इच्छा नाहीये. आमच्या निर्मात्यांनी तिसरी मानधनवाढ हे जितक्या ठाशिवपणे सांगितलं, तितक्या ठाशिवपणे हे सांगितलं नाही की आठ वर्षांतली तिसरी मानधनवाढ. आता असा समज झालाय की एका वर्षांत आम्ही तीन वेळा पैसे वाढवून मागितलेत, तर तसं नाहीये.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबद्दल फक्त कलाकारच नाही तर प्रेक्षकही व्यक्त होताना दिसत आहेत.