Aarti Solanki Weight Loss Journey: वजन कमी करणे ही अनेकांसाठी मोठी समस्या असते. वाढलेले वजन, त्याबरोबर येणारे अजार, वाढलेल्या वजनामुळे अनेक गोष्टी न करता येणे, अशा अनेक गोष्टींचा बऱ्याच जणांना सामना करावा लागतो. मात्र, चिकाटीने काहीजण वजन कमी करतात. त्यासाठी अनेक प्रयत्न करतात. त्यांच्या जीवनशैलीत बदल करतात.
अगदी आहारात काय असले पाहिजे, कोणता व्यायाम केला पाहिजे, कधी कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे, तसेच झोपण्याची वेळ कोणती असली पाहिजे अशा अनेक गोष्टींमध्ये बदल केले जातात. विशेष म्हणजे यामध्ये सातत्य ठेवले जाते आणि वजन कमी केले जाते.
अनेक कलाकारही त्यांच्या वजन घटवण्याच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने सांगतात. ते नेमके काय करतात, काय खातात याबद्दलही ते बोलतात. अनेकांचा प्रवास हा इतरांसाठी प्रेरणादायी असतो. आता अभिनेत्री आरती सोलंकीने तिच्या फिटनेसबद्दल वक्तव्य केले आहे. तिने तिचे वजन कसे कमी केले याबद्दल ती बोलली आहे.
“मी ६७ किलो वजन कमी…”
आरती सोलंकीने नुकतीच अभिजात मराठी फिल्मी या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचे ६७ किलो वजन कमी केल्याबद्दल वक्तव्य केले. आधी तिचे वजन १३२ किलो होते. ती म्हणाली, “मी ६७ किलो वजन कमी केलं होतं. आता पुन्हा नाटकाच्या रिहर्सलमुळे मला चालण्यासाठी वेळ मिळत नाही, पण वजन कमी करण्यासाठी मी पाच वर्षे मेहनत घेतली. मी फक्त चालत असे. संध्याकाळी सहानंतर शक्यतो मी काही खात नाही. अगदीच भूक लागली तर मी काहीतरी खाते. माझं ठरलेलं आहे. एकतर पाणी पुरी किंवा सँडवीच खाते, पण हेही मी शक्य असेल तर खात नाहीच. मी ९ वाजता झोपते, हे माझं रुटिन आहे, त्यामुळे माझं वजन कमी झालं. आता एवढं वजन कमी केल्यानंतर मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.”
फिटनेसकडे वळल्यानंतर मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला, यावर आरती म्हणाली, “आधी मी कधीच आरशासमोर उभं राहून स्वत:ला बघत नव्हते. पण, जसं मी फिटनेसकडे वळले तसं मी स्वत:ला आरशात बघायला लागले आणि तयार व्हायला लागले.” आरती असेही म्हणाली की, आज फिटनेस माझ्यासाठी शिस्त आहे, ते पाळते; काटेकोरपणे गोष्टींचे पालन करते.
आरती सोलंकीने याच मुलाखतीत दिगंबर नाईक व तिच्याबद्दल लोक बोलत असत असाही खुलासा केला. तसेच, त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे तिने सांगितले. याबरोबरच तिचे १३ वर्षांपासून कोणावर तरी एकतर्फी प्रेम असल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, आगामी काळात ती कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
