Aarya Ambekar entry in Kamali: ‘कमळी’ मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सिद्धटेक या गावातून स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कमळी मुंबईत आली आहे. जेव्हापासून ती मुंबईत आली, तेव्हापासून तिला कोणत्या ना कोणत्या संकटाला सतत सामोरे जावे लागते.

कमळी व अनिका यांची जेव्हापासून भेट झाली तेव्हापासूनच अनिकाला कमळी आवडत नाही. त्यानंतर कमळीने अनिका शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घेतले, त्यानंतर अनिकाने तिच्या आई व आजीला हाताशी धरून कमळीला अनेकदा त्रास दिला.

या सगळ्यात कमळीची मैत्रीण निंगी, हृषी आणि अन्नपूर्णा आजी यांनी तिला वेळोवेळी मदत केली. तिला साथ दिली. हृषीला आता कमळी आवडू लागली आहे. त्याचे तिच्यावर प्रेम आहे, पण आजपर्यंत त्याने याबद्दल तिला किंवा इतर कोणालाही सांगितले नाही. दुसरीकडे त्याची आई त्याच्यासाठी मुलगी बघत आहे, त्याला इतर मुलींची स्थळे शोधत आहे.

Award Banner

आता या सगळ्यात हृषीच्या आयुष्यात एक मुलगी येणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये तिची एन्ट्री पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की एक गाडी थांबते, त्यातून एक मुलगी उतरते. त्याचवेळी ऐकायला मिळते की अनामिका हृषीच्या आयुष्यात येणार. त्या मुलीला पाहून कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये कुजबुज सुरू होते. हृषीची बहीण कमळीला सांगते, “अगं याच त्या म्युझिक टीचर आहेत, खूप छान गातात असं ऐकलंय मी”, याचवेळी त्या मुलीची झलक दिसते, तिचे नाव अनामिका असे आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते, अनामिका हृषीला हाक मारते. ती त्याला म्हणते, “ए हृषी, मी आवडले का?”, तिचा तो प्रश्न ऐकून ऋषी हैराण होतो. पुढे अनामिका त्याला म्हणते, “अरे, मी इथे फक्त लेक्चर घ्यायला नाही, लग्नासाठी मुलगाही बघायला आली आहे.”

प्रोमोच्या शेवटी अनामिका हृषीला हाताला धरून कुठेतरी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “हृषीच्या आयुष्यात येणार अनामिका”, अशी कॅप्शन दिली आहे. ही अनामिका म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर आहे.

नेटकरी म्हणाले…

आता ‘कमळी’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आर्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “अनेपेक्षित”, “सुंदर एन्ट्री”, “माझी आवडती आर्या आंबेकर”, “धक्कादायक ट्विस्ट”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, आता अनामिकाच्या येण्याने मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.