Aarya Ambekar on her role Anamika in Kamali: आर्या आंबेकर ही लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. तिने आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. तसेच, आर्या ती सध्या काय करते या सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
आता आर्या पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. कमळी या मालिकेत ती अनामिका या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. म्युझिक टीचर म्हणून ती कमळीच्या कॉलेजमध्ये येणार आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मालिकेतील कलाकार, तसेच सेटवरील वातावरण यांबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, तिच्या पात्राचे जसे डायलॉग्ज आहेत, तसे ती खऱ्या आयुष्यात कधी वागते का, याबद्दलही ती बोलली आहे.
“मला त्यांची काम करण्याची पद्धत आवडली”
नुकतीच आर्या आंबेकरने ‘लाईमलाइट मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत कमळी या मालिकेतील सेटवरील कलाकारांबद्दल तिला विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, “ही टीम खरंच खूप छान आहे. मुळात प्रॉडक्शन हाऊस खूप छान आहे. त्यांनी चांगली व्यवस्था केली आहे. त्यांनी स्वच्छ रूम दिल्या आहेत. वॉशरूम स्वच्छ आहेत. प्रत्येक रूममध्ये एसी आहे. प्रत्येकाला वेगळी रूम आहे.”
पुढे ती म्हणाली, “मला त्यांची काम करण्याची पद्धत आवडली आहे. प्रत्येकाला आपलंसं करून घेणं, हा सगळा बॉण्ड त्यांनी जुळवून आणला आहे.”
मालिकेतील पात्राबद्दल बोलताना आर्या आंबेकर म्हणाली, “काही-काही डायलॉग्ज म्हणताना मला खूप वेगळं वाटतं. कारण- मी आयुष्यात कधी कोणाला म्हणाले नाहीये की, तुला मी आवडली नाही का? तुला मी आवडले ना? तू मला प्रपोज करशील का? असं मी कधीच म्हणाले नाही. त्यामुळे लाजत-बिचकत म्हटल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे माझ्यासाठी हे एक धाडसच आहे.”
आर्या असेही म्हणाली, “स्क्रिप्टचा गठ्ठा पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला होता की हे एका दिवसात शूटिंग करण्याचं स्क्रिप्ट आहे का? हे पुस्तक आहे; स्क्रीप्ट नाही, असं मला वाटलं. डायलॉग्ज पाहिल्यानंतर मला थोडंसं अवघड वाटतंय.”
तुझ्यासारख्या गायिकेला अभिनय अवघड वाटतोय का? यावर आर्या म्हणाली, “अभिनय अवघड वाटत नाही; डायलॉग्ज म्हणणं अवघड वाटतं. कारण- ते माझ्या स्वभावासारखे नाहीत.”
आर्याने या मालिकेत असेही सांगितले की, कमळी मालिकेतील तिची भूमिका कॅमिओ आहे. तिने या मालिकेत अनामिका हे पात्र साकारले आहे. आता अनामिकाच्या येण्याने ऋषीच्या आयुष्यात काय फरक पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
