‘शिवा'(Shiva) व ‘लाखात एक आमचा दादा'( Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकांचा महासंगम प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. या मालिकांमध्ये सतत काहीतरी नवीन घडताना दिसत आहे. आता या दोन्ही मालिकांच्या महासंगमाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘शिवा’मधील आशूवर संकट आल्याचे दिसत आहे.
आशूचा जीव वाचवण्यासाठी शिवा-सूर्या येणार एकत्र
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, शिवा म्हणते, “हा आशूचा फोन आहे. सिताई बरोबर म्हणत होत्या की, आशूचा फोन पडण्याचा आवाज आला म्हणजे आशूला कोणीतरी…” पुढे पाहायला मिळते की, सूर्याच्या घरात सर्व जण काळजी करीत बसले आहेत. तर, शिवाची आजी रडताना दिसत आहे. सूर्या फोन लावताना दिसत आहे. शिवा म्हणते, “माझा शब्द आहे की, आशूच्या केसालादेखील धक्का लागणार नाही. दुसरीकडे काही लोक आशूला सुनसान जागेवर घेऊन आल्याचे दिसत आहे. त्यातील एका माणसाच्या पाठीवर एक काठीचा फटका बसतो. तो म्हणतो, “कोण आहे रे तो?” आशू हसत म्हणतो, “ए टोपी, तो नाही; ती आहे.” आणि त्यानंतर तिथे शिवा दिसते. शिवा आशूला वाचवायला आल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती गुंडांबरोबर मारामारी करताना दिसत आहे. एक वेळ अशी येते की, शिवाला सर्व जण घेरतात. मात्र, त्याच वेळी शिवाच्या मदतीला सूर्या आल्याचे पाहायला मिळत आहे. मग दोघे मिळून गुंडांना मारतात.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “शिवा आणि सूर्या मिळून आशूवरील संकट दूर करणार?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे आशू, शिवा व आजी साताऱ्यात आजीची जमीन परत मिळविण्यासाठी आले आहेत. मात्र, ती जमीन जालिंदर म्हणजेच डॅडींनी बळकावली आहे. त्यांनी ती जमीन देण्यास साफ नकार दिला. तसेच शिवाच्या आजीचा अपमानदेखील केला. त्यानंतर शिवाने त्यांची कॉलर धरल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच वेळी तिथे सूर्या आला होता. त्याने तिला डॅडींची कॉलर सोडायला सांगितले होते. मात्र शिवाने, कॉलर सोडत नाही. काय करायचे तर कर; पण मी कॉलर सोडणार नाही, असे म्हटले होते. आता आशूला वाचवण्यासाठी सूर्या व शिवा एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.