Abhidnya Bhave Ganpati Celebration 2026 : गणेश चतुर्थीनिमित्त आज संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. काही कलाकार सुट्ट्या घेऊन गणपतीनिमित्त गावी कोकणात रवाना झाले आहेत. सगळ्याच कलाकारांनी बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अभिज्ञा भावेने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिज्ञा आणि तिचा नवरा मेहुल पै यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवात आकर्षक सजावट केली जाते.

यापूर्वी अभिज्ञाच्या घरी गणेशोत्सवात स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मंदिराचा देखावा, तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता. त्यामुळे यंदा अभिज्ञाच्या घरी बाप्पासाठी कोणता देखावा साकारला जाणार याची उत्सुकता तिच्या सर्वच चाहत्यांना होती.

अखेर सजावटीचे सुंदर असे फोटो शेअर करत अभिज्ञाने बाप्पाची झलक सर्वांना दाखवली आहे. यंदा अभिनेत्रीच्या घरचा बाप्पा श्रीकृष्णाच्या रुपात विराजमान झाला आहे. “श्री कृष्णाय नमः श्री कृष्ण आले अमुच्या घरी, घरात अवतरली वृंदावन नगरी ||” असं कॅप्शन अभिज्ञाने या फोटोंना दिलं आहे.

अभिज्ञा व मेहुल यांच्या घरी यंदा वृंदावन नगरी अवतरल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांनी घराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा गेट उभारून सुंदर अशी सजावट केली आहे. यावर ‘वृंदावन’ असं लिहिण्यात आलं आहे.

Abhidnya Bhave Ganpati Celebration 2026
अभिज्ञा भावेच्या घरी अवतरली वृंदावन नगरी

प्रवेशद्वारातून तुम्ही आत आलात की, समोरच संस्कृत श्लोक लिहिल्याचं पाहायला मिळेल. “ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने| प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः” या श्लोकाच्या बरोबर खाली बाळकृष्णाचं चित्र रेखाटण्यात आलं आहे.

Abhidnya Bhave Ganpati Celebration 2026
अभिज्ञाच्या घरी श्रीकृष्णाच्या रुपात बाप्पा

अभिनेत्रीच्या घरी यंदा श्रीकृष्णाच्या रुपात बाप्पाचं आगमन झालं असून, घरातही तिने भव्य देखावा साकारला आहे. यावेळी अभिज्ञाचे आई-बाबा, सासू-सासरे असे सगळे कुटुंबीय उपस्थित होते. तिने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवरही चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Abhidnya Bhave Ganpati Celebration 2026
अभिज्ञा भावेची पोस्ट

अभिज्ञा व तिच्या पतीने बाप्पासाठी केलेली ही सुंदर तयारी पाहून सर्वजण त्यांचं कौतुक करत आहेत. मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवानी सोनार, ऋतुजा बागवे, मयुरी देशमुख या सर्वांनी अभिज्ञाच्या पोस्टवर खास कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, अभिज्ञा भावेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती झी मराठीच्या ‘तारिणी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.