Abhidnya Bhave : नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर, स्त्रीत्वाचा सन्मान आणि स्त्रीशक्तीचा उत्सव! देवीच्या नऊ रूपांची आराधना करताना स्त्रीच्या सामर्थ्याची, तिच्या कर्तृत्वाची आणि तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा सण आहे. मात्र, स्त्रीशक्तीचा खरा अर्थ केवळ देवीच्या पूजेपुरता मर्यादित नसून, स्त्रीला समानतेने वागवणं, तिचे विचार समजून घेणं आणि तिला तिच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य देणं, यातही आहे. स्त्रीशक्तीकडे पाहण्याचा असाच एक महत्त्वाचा दृष्टिकोन ‘तारिणी’ मालिकेत कौशिकीची भूमिका साकारणाऱ्या अभिज्ञा भावेने मांडला आहे.

‘तारिणी’ मालिकेतील कौशिकी ही एका मीडिया हाऊसची मालकीण आहे. स्वतःचं न्यूज चॅनल चालवणारी कौशिकी आपल्या कामातून आणि निर्णयांतून तिचं वेगळेपण दाखवते. तिच्या या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने अभिज्ञा भावेने स्त्रीशक्तीचा अर्थ, समाजात स्त्रीला मिळणारी वागणूक आणि स्त्रियांनी एकमेकींना समजून घेण्याची गरज याविषयी आपले विचार मांडले आहेत.

अभिज्ञा भावे म्हणते, “माझ्यासाठी ‘स्त्रीशक्ती’ म्हणजे… जेव्हा पुरुष खऱ्या अर्थाने स्त्रीचा मान ठेवतात आणि तिची शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आम्हा स्त्रियांना समान समजा, आम्हाला आमचं आयुष्य जसं जगायचं आहे, तसं जगू द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. स्त्रीशक्तीचा हा अर्थ जेव्हा समाजाला समजेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देवीची आराधना होईल, असं मला वाटतं. स्त्रीशक्तीकडे बंडखोरीच्या नजरेतून पाहता कामा नये. किमान स्त्रीशक्ती समजून घेण्याचा प्रयत्न तरी समाजाने केला पाहिजे.”

अभिज्ञा पुढे सांगते, “मला असं वाटतं की आजच्या काळात सगळ्यात मोठी गरज आहे ती एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेण्याची. आपल्या विरोधात पूर्ण समाज आहे, त्यात आपणही विभागलो गेलो, तर आपलंच जगणं कठीण होऊन जाईल. त्यामुळे एकमेकींना किमान समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे स्त्रिया एकमेकींना समजून घेतात; पण अजूनही असे बरेच गट आहेत, जे एकाच साच्यात अडकलेले आहेत. म्हणूनच एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं आणि तिला सांभाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते घर असो, व्यवसाय असो, शिक्षण असो किंवा समाजातील कोणतंही क्षेत्र असो. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं सहकार्य मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.”

नवरात्रीच्या सणाविषयी बोलताना अभिज्ञा म्हणाली, “तसं पाहायला गेलं तर आमच्या घरात नवरात्रीचं काही विशेष सेलिब्रेशन नसतं. देवीच्या दर्शनाला जाणं, देवीचे देखावे पाहणं असं असतं. गरबा खेळण्यात मला फारसा रस नाही. त्यामुळे नवरात्रीच्या उत्सवात मी माझ्या घरातल्या देवीची मनोभावे पूजा करते…माझं मन यामुळे प्रसन्न होतं.”

स्त्रीशक्ती म्हणजे केवळ सामर्थ्याचं प्रदर्शन नव्हे, तर एकमेकींना समजून घेणं, समानतेचा आदर करणं आणि स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळणं, हा अभिज्ञा भावेचा विचार नवरात्रीच्या निमित्ताने एक महत्त्वाचा संदेश देतो. देवीची आराधना करताना आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचाही सन्मान करणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं, यातूनच स्त्रीशक्तीचा खरा उत्सव साजरा होऊ शकतो.