Abhijeet Khandkekar Birthday Video : ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरांत पोहोचला. अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनयासह अभिजीत उत्तम सूत्रसंचालक, निवेदक म्हणूनही ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत अनेक अवॉर्ड शो, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम याचं होस्टिंग अभिजीतने केलेलं आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याने ७ जुलैला आपला ४० वा वाढदिवस साजरा केला.
अभिजीतच्या वाढदिवसाला संपूर्ण मराठी कलासृष्टी अवतरली होती. अभिनेत्याच्या बर्थडे केकवर त्याचा डॅशिंग लूकमधील एक फोटो होता आणि यावर ‘Abhi Getting Hotter At 40’ असं लिहिण्यात आलं होतं. यावरून अभिजीतने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केल्याचं स्पष्ट झालं आहे.
अभिजीतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने म्हणजे सुखदाने या खास पार्टीचं आयोजन केलं होतं. समिधा गुरु, अभिजीत गुरु, भार्गवी चिरमुले, श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी, दीप्ती तळपदे, पूजा सावंत, गश्मीर महाजनीची बायको गौरी, पूजा सावंतची भावंडं, क्षमा देशपांडे, मृणाल देशपांडे असे सगळे कलाकार अभिनेत्याच्या बर्थडे पार्टीला उपस्थित होते.
सर्वात आधी सुखदाने वाढदिवसानिमित्त अभिजीतचं औक्षण केलं. यानंतर अभिजीत व सुखदा दोघांनीही पार्टीला आलेल्या आपल्या मित्रमंडळींची प्रेमाने विचारपूस केली. शेवटी या सगळ्यांनी एकत्र लंच केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिजीतने या पार्टीदरम्यान, सगळ्या मित्रमंडळींसह गोड फोटो सुद्धा काढले.
अभिनेता हा व्हिडीओ शेअर करत म्हणतो, “तर अशाप्रकारे मी माझा वाढदिवस साजरा केला आहे…हा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता. सुखदा थँक्यू तुझ्यामुळे हे शक्य झालं. वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला शुभेच्छा दिल्यात…त्या सगळ्यांचे आभार! प्रत्येकाला वैयक्तिकरित्या मेसेजवर रिप्लाय देऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”
दरम्यान, अभिजीत खांडकेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तो ‘मर्दिनी’ सिनेमात झळकला आहे. यामध्ये अभिजीसह प्रार्थना बेहेरे, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
