'बिग बॉस'चे पाचवे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासून बिग बॉस(Bigg Boss Marathi) च्या घरात वाद होताना दिसत आहेत. आता घरात दोन गटदेखील पडल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी 'भाऊचा धक्का' या एपिसोडमध्ये या पर्वाचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने निक्की तांबोळीची तिची इतर सदस्यांप्रती असलेल्या वागणुकीसाठी कानउघाडणी केली होती, तर दुसऱ्या आठवड्याच्या 'भाऊचा धक्का' या शनिवारच्या एपिसोडमध्ये जान्हवी किल्लेकरला खडे बोल सुनावले आहेत. आता यादरम्यान, एका प्रोमोमध्ये, अभिजीत सावंतने सगळ्या वस्तू फोडत अरबाज पटेलवरचा आपला राग व्यक्त केला होता. काय म्हणाला अभिजीत सावंत? बिग बॉसच्या 'भाऊचा धक्का' या एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत सर्व भांडी फोडत अरबाज पटेलवरचा आपला राग व्यक्त करताना दिसत आहे. समोर असलेल्या वस्तू फोडताना तो म्हणतो, "सगळ्यात पहिलं एका मुलीची आणि मुलाची मैत्री असेल तर त्याचा अर्थ दुसराच असला पाहिजे असं नाही, त्यांच्यामध्ये चांगली मैत्रीपण असू शकते. आयुष्यामध्ये एकच नातं नसतं, भरपूर गोष्टी असतात. एकेका गोष्टीला फक्त एकाच नजरेने बघायचं नसतं", असे म्हणत त्याने आपला अरबाज पटेलवरचा राग व्यक्त केला आहे. त्यानंतर रितेश देशमुख अभिजीतला, अभिजीत तुम्ही तुमच्या मनात किती गोष्टी भरून ठेवता, कधी पण राग हा वेळच्या वेळी काढला पाहिजे, नाहीतर तो असा बाहेर पडतो, असे म्हणत समजावत असल्याचे दिसत आहे. हेही वाचा: “घटस्फोटानंतर तो खूप दु:खी…”, नागा चैतन्यच्या साखरपुड्यावर वडील नागार्जुन यांची प्रतिक्रिया; समंथाबद्दल म्हणाले… अभिजीत आणि अरबाजला एकमेकांवरचा राग काढण्यासाठी वस्तू फोडण्याचा हा टास्क रितेश देशमुखने दिला होता. यावेळी अभिजीतने आपल्या मनातला राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या आठवड्यात अभिजीत सावंतने 'गुणगुणावे गीत वाटे' हे गाणे गात घरातील स्पर्धकांचे तसेच प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. आता अभिजीत सावंतचा इथून पुढचा 'बिग बॉस'मधील प्रवास कसा असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच आता आजच्या भागात, 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वाच्या दुसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराचा निरोप घेणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. या आठवड्यात योगिता चव्हाण, निखिल दामले, घन:श्याम दरडे, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे हे स्पर्धक घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. याबरोबरच भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये 'खेल खेल में' या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत असून आता ते 'बिग बॉस'च्या मंचावर काय धमाल करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे असणार आहे.