आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका गायक म्हणजेच अभिजीत सावंत. त्याने ‘बिग बॉस मराठी’सारख्या शोमधून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या अभिजीत एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. गायकाने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिला आलिशान फ्लॅट गिफ्ट दिला आहे. याबद्दलची खास पोस्ट त्याची पत्नी शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिजीतच्या पत्नीचं नाव शिल्पा एडवणकर-सावंत असं आहे. या जोडप्याला दोन मुली आहेत. बायकोच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने तिला खास नवीन घर भेट म्हणून दिलं आहे.

शिल्पाने नव्या घराची पहिली झलक फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना दाखवली आहे. आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. २०२६ मध्ये अनेक कलाकारांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. आता यामध्ये शिल्पाचं नाव देखील जोडलं जाणार आहे. आता अभिजीत-शिल्पा त्यांचं हे नवीन घर कसं सजवतात याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.

शिल्पाने नव्या घराच्या बाल्कनीतून खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिजीत-शिल्पाच्या दोन्ही मुलींची झलक सुद्धा पाहायला मिळतेय. तसेच या नव्या घराच्या किल्लीवर १७०२ हा क्रमांक लिहिल्याचं पाहायला मिळतंय. यावरून गायकाने बायकोसाठी हे नवीन घर १७ व्या मजल्यावर खरेदी केल्याचं स्पष्ट होतं.

शिल्पाने, “या गिफ्टसाठी थँक्यू…माझं नवीन घर” असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे. अभिजीतने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता सावंत कुटुंबीय या नव्या घरात केव्हा गृहप्रवेश करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

New home abhijeet sawant
अभिजीत सावंतने पत्नीला गिफ्ट दिलं नवीन घर ( Abhijeet Sawant )

दरम्यान, अभिजीत सावंतच्या सध्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, साधारण दोन वर्षांपूर्वी अभिजीत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता. तर, यानंतर अभिजीतने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात सुद्धा सहभाग घेतला होता. यासह ‘बिग बॉस’नंतर अभिजीतचे अनेक नवनवीन म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.