अभिजीत सावंत काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’ मराठीमध्ये पाहायला मिळाला होता. त्यानंतर तो ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ या कार्यक्रमात झळकला. अशातच आता नुकतीच त्याने ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने त्याच्याबद्दलचा व बाळासाहेब ठाकरे यांचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी पूर्वी बी.एम.सी.च्या घरामध्ये राहायचो आणि तेव्हा एक पत्रकार माझी मुलाखत घेण्यासाठी घरी आला होता. तेव्हा त्या बिल्डिंगखाली “ही जागा असुरक्षित आहे” असं लिहिलेलं असायचं. आजही तिथे असंच लिहिलेलं आहे. तो पत्रकार ते वाचून वर आला आणि पूर्ण मुलाखत झाल्यानंतर त्याने मला विचारलं, बिल्डिंगच्या खाली असं लिहिलेलं आहे. मी म्हटलं हो लिहिलं आहे, आम्ही पण आता घर बदलणार आहोत. त्यावर त्याने विचारलं, “घर खरेदी केलं आहे का तुम्ही” मी म्हटलं नाही, बघत आहोत.
“यानंतर त्याने माझे फोटो वगैरे काढले आणि वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर अभिजीत सावंत बेघर असं छापलं. ते मुंबईतील नामांकित वृत्तपत्र होतं.” पुढे अभिजीत म्हणाला, “तेव्हा मी ‘इंडियन आयडॉल’ जिंकलो होतो, त्यामुळे माझ्याकडे पैसेही होते आणि मी घर खरेदी करणार होतो, पण याने अशी बातमी छापली. नंतर मला बाळासाहेबांचा फोन आला. बाळासाहेबांनी मला फोन करून घरी बोलावलं.”
“बाळासाहेबांच्या घरी गेल्यानंतर ते म्हणाले, “मी ती बातमी वाचली, माझा एक माणूस आहे, तो बिल्डर आहे; तो तुला चावी आणून देईल ते घर तुझं.” मी म्हटलं धन्यवाद, पण मी घर खरेदी केलं आहे. घराचे अर्धे पैसेही दिले आहेत. मी जुन्या घरात राहात आहे कारण अजून हे नवीन घर झालं नाहीये आणि मला त्या घरामध्ये राहायला आवडतं. त्यावर ते ठीक आहे असं म्हणाले.”
दरम्यान, ‘बिग बॉस’फेम अभिजीत सावंत हा पहिल्यांदा चर्चेत आला ते ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमातून. या कार्यक्रमात त्याने त्याच्या सुरेल आवाजात गाणी गात अनेकांना त्याच्या गाण्यांच्या प्रेमात पाडलं होतं. तर तो या कार्यक्रमाचा विजेताही ठरला होता. यानंतर खऱ्या अर्थाने तो गायक म्हणून नावारुपाला आला. आजवर अभिजीतने हिंदी, मराठी दोन्ही भाषेतील गाणी गायली आहेत. परंतु, त्याने गायलेली ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ आणि ‘सर सुखाची श्रावणी’ ही दोन गाणी त्याच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहेत.