Abhijeet Sawant on Suraj Chavan : सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता ठरला आणि आता अजूनही त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्याने सहानुभूती मिळवून हे पर्व जिंकले आहे, असेही म्हटल्याचे पाहायला मिळाले होते. आता या पर्वाचा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.

“मला पहिल्या दिवसापासून विश्वास…”

अभिजीत सावंतने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. सूरजने मुलाखतीत अभिजीतदादाने मला खूप पाठिंबा दिला, असे म्हटले आहे. त्यानंतर सूरजचा वावर घरात कसा होता? तुझ्याबरोबर त्याचं छान बॉण्डिंग झालं होतं. तू सूरजबद्दल काय सांगशील, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्याबाबत बोलताना अभिजीत सावंतने म्हटले, “बिग बॉसच्या घरात असताना मी नेहमी म्हटले आहे की, मी सूरजला समजू शकतो. कारण- मी ज्यावेळी इंडियन आयडॉलमध्ये होतो, तेव्हा मीदेखील असाच होतो. फक्त हाच फरक होता की, मी शहरातला मुलगा होतो आणि हा एक गावातील मुलगा आहे. अजाणतेपणा तेवढाच होता. त्याला जितकी आता गोष्टींची समज आहे, त्यावेळी मलादेखील तितकीच समज होती. ज्यावेळी इंडियन आयडॉल जिंकलं होतं, त्यावेळी मलाही सगळं नवीन होतं आणि त्यामुळे मी सूरजबरोबर खूप कनेक्ट करायचो.”

“मी सगळ्यांना सांगायचो की, त्याला कळत नाही, असं बोलू नका. त्याला स्वत:ला शिकू द्या. या सगळ्या गोष्टी त्याला समजू द्या. कारण- तुम्ही त्याला पाठीशी घालू शकत नाही. म्हणून मी त्याला नेहमी प्रोत्साहन द्यायचो. त्याला माझा नेहमीच पाठिंबा होता.“, असे सूरजला दिलेल्या प्रोत्साहनाबात अभिजीतने सांगितले.

अनेकांनी सूरज ट्रॉफी जिंकल्यामुळे शोचे नाव सिंपथी शो, असे ठेवावे, असे म्हटले होते. त्यावर तुझं मत काय आहे, यावर बोलताना अभिजीतने म्हटले, “मला कधीच वाटलं नाही की, सूरज सिंपथी गेम खेळतोय. मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की, सूरज चांगला खेळाडू आहे. तो आणखीन चांगला झाला असता. तुम्ही शेवटी शेवटी बघा. मी, सूरज, निक्की, जान्हवी आम्ही चौघांनी मिळून किती चांगले क्षण निर्माण केले आहेत; ज्यामध्ये तो त्याचे डायलॉग म्हणतो आणि आम्ही सगळे ‘झापूक झुपूक’ म्हणत आहोत. तो व्हिडीओ व्हायरल झाला. असे किती क्षण होते, जे सूरज आणखी करू शकला असता. पण, त्याला नेहमी तू असं करू नको, अरे तुला कळत नाही, असे म्हटले जात होते.”

“आपण ना एक चौकट ठरवतो; पण एखाद्यासाठी आपण चौकट का ठरवतो? मी या गोष्टींबद्दल बोलायचो. अशी चौकट ठरवणं चुकीचं होतं आणि म्हणून मला वाटतं की, तो कधीही सिंपथी गेम खेळलाच नाही. त्या गोष्टी या लोकांनी बनवल्या. सूरजला सिंपथी वोट मिळत आहेत, हे बाकीच्यांनी निर्माण केलं”, असे म्हणत अभिजीतने आपले मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा: “ती मला सहन…” घटस्फोटाबाबत प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; दुसऱ्या पत्नीबद्दल म्हणाला, “मी तिला चार महिने…”

दरम्यान, सूरज चव्हाणनेदेखील एका मुलाखतीत, “अभिजीतदादानं मला खूप पाठिंबा दिला. मला गोष्टी समजावून सांगितल्या”, असे म्हणत त्याचे कौतुक केले होते. आता बिग बॉसमधून बाहेर पडलेले हे सदस्य विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.