Abhijeet Sawant on Marathi and Hindi Industry: ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनचा विजेता होत अभिजीत सावंतने त्याची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर विविध गाण्यांमधून त्याने चाहतांच्या मनावर राज्य केले. तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्येदेखील तो सहभागी झाला होता. त्याच्या खेळाने त्याने सर्वांची मने जिंकली होती. आता तो विविध कॉन्सर्ट आणि म्युझिक व्हिडीओ या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
अभिजीत सावंतने नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरमधील अनेक गोष्टी सांगितल्या. प्रियांका चोप्रा, शाहरुख खान यांची भेट झाली तेव्हाचे किस्सेही सांगितले.
“मी खूप दिग्दर्शकांना…”
या मुलाखतीत त्याला विचारले की इंडियन आयडलचा विजेता झाल्यानंतरही मराठी इंडस्ट्रीमधून तुला गाण्याची ऑफर यायला इतका वेळ का लागला? त्यावर अभिजीत सावंत म्हणाला, “इंडियन आयडल झाल्यानंतर मी खूप दिग्दर्शकांना भेटलो. म्युझिक डायरेक्टर, चित्रपट दिग्दर्शकांना सुद्धा भेटलो. त्यावेळी मी मुंबई युनिव्हर्सिटी मधून साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स करत होतो. त्यावेळी अगदी मी छोट्या-छोट्या चित्रपटांसाठी गायचो.”
“मी दिग्दर्शकांनासुद्धा भेटलो. पण, त्यांना भेटल्यानंतर मराठी मुलगा मोठा झालाय, असं नाही वाटलं नाही. त्याबद्दलचा अभिमान आहे, असं काही वाटलं नाही. ही एक गोष्ट होती. मी यामध्ये स्वतःला सुद्धा धरेन. आपल्याला सवय असते. आपण असं म्हणतो की ठीक आहे, त्यात एवढं काय आहे.”
तो असेही म्हणाला, “प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. मला मराठी चित्रपट करायचा होता, त्यासाठी सुद्धा मी लोकांना भेटलो. मी त्यांना म्हणायचो की मला काम करायचं आहे. गायन, अभिनय काहीही करेन.”
अभिजीत पुढे म्हणाला, “हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये मी हे बघितलं आहे. हिंदी इंडस्ट्री खूप संधी साधू आहे. कदाचित हा शब्द तितका योग्य नसेल. पण मला असं म्हणायचं आहे की त्यांना जर माहीत असेल की ती संधी आहे किंवा त्या माणसाकडून आपल्याला काहीतरी मिळणार आहे. तर ते लगेच तुम्हाला काम देण्याबाबत विचार करतात. ते लगेच असा विचार करतात की या माणसाचा आपण वापर करून घेऊ.”
“मराठीमध्ये असं होत नाही.मराठीमध्ये असं विचार करतात की ठीक आहे आपल्याला काय? आपलं चांगलं चाललंय कशाला उगाच इकडे तिकडे बघा.”
अभिजीत म्हणाला, “मराठी इंडस्ट्रीमध्ये आदरभाव खूप आहे. आता मी शिकलोय की आता सगळ्यांना त्याच पद्धतीने वागवलं गेलं पाहिजे. आता मला जी नवीन मुलं भेटतात. जी तरुण मुलं असतात, इन्फ्लुएन्सर्स असतात. तर त्यांचं वागणं मला थोडसं उद्धट वाटतं. ते उद्धट नसतात. कदाचित ज्यावेळी मी नवीन आलो होतो, त्यावेळी मी सुद्धा तसाच असणार. जे मला बघत होते, ज्यांना मी सीनियर म्हणून भेटत होतो, तर मी त्यांना उद्धट वाटला असेन. मी या संपूर्ण प्रोसेसमधून गेलोय. म्हणून आताच्या मुलांबद्दल मला वाईट वाटत नाही. पण कदाचित त्यावेळी माझ्या सिनिअर्संना वाईट वाटलं असेल. या अशा काही गोष्टी आहेत.”
