Abhijeet Sawant Indian Idol News Marathi: २००४ साली ‘इंडियन आयडॉल’चा पहिला सीझन जिंकून संपूर्ण देशाला आपल्या आवाजाने वेड लावणारा मराठमोळा गायक अभिजित सावंत तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच मंचावर परतला आहे. ‘इंडियन आयडॉल: लेजेंड्स रिटर्न’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या अभिजितने त्याच्या या पुनरागमनावर आणि संगीताच्या प्रवासावर मौन सोडले आहे. “टीव्हीने मला ओळख दिली,” असं तो म्हणाला. तसेच त्याने पार्श्वगायन, पायरसीचा काळ आणि ‘बिग बॉस मराठी’सारख्या रिअॅलिटी शोजमधील सहभागावर भाष्य केलं.
२२ वर्षांनंतर त्याच मंचावर परतण्याबद्दल अभिजित सावंत म्हणाला, “जुन्या आठवणींना उजाळा दिल्यासारखं वाटतंय. माझं करिअर याच मंचावरून सुरू झालं. त्यामुळे परत येऊन जुने दिवस अनुभवायला मी खूप उत्सुक होतो. हा एक वेगळाच अनुभव होता. काही लोकांना वाटेल की ही एक स्पर्धा आहे, पण मी आता त्यापलीकडे गेलोय. जुन्या आठवणींना उजाळा देणं आणि नवीन आठवणी तयार करणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक मजेशीर आणि आनंदी प्रवास आहे.”
२००४ चा काळ वेगळा होता – अभिजीत सावंत
नवीन पिढीच्या गायकांबरोबर मंच शेअर करण्याबद्दल अभिजीत म्हणाला, “माझ्यासाठी हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे, कारण आजची पिढी वेगळी आहे. त्यांची वागण्याची आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे. या नव्या पिढीसोबत आणि नव्या गायकांसोबत काम करताना मी एक व्यक्ती म्हणून अधिक परिपक्व झालोय. नव्या पिढीशी कसं जुळवून घ्यायचं हे मी शिकतोय. २००४ चा काळ वेगळा होता. तो पहिला सीझन खूप निखळ आणि खरा होता.”
इंडियन आयडॉलनंतर माझं जग बदललं – अभिजीत सावंत
‘इंडियन आयडॉल १’ जिंकल्यानंतर आयुष्य कसं बदललं? ते अभिजीतने सांगितलं. “इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. आधी मी एक सामान्य मुलगा होतो, जो संगीत शिकत होता आणि मंचावर परफॉर्म करण्याची संधी शोधत होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत आम्ही सगळे भारतीय प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलो. माझं संपूर्ण जगच बदललं. आजही अनेक लोक मला विचारतात की, इंडियन आयडॉल नंतर तुझी सगळी स्वप्ने पूर्ण झाली का? तर शोच्या आधी माझी स्वप्ने खूप मर्यादित होती. त्यानंतर मी मोठी स्वप्ने पाहायला सुरुवात केली. खरं तर इंडियन आयडॉलने मला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्यासाठी मेहनत करण्याची संधी दिली,” असं अभिजीत सावंत म्हणाला.
कोणाकडे काम मागावं लागत नाही – अभिजीत सावंत
अभिजीत सावंत पुढे म्हणाला, “२००७ मध्ये माझ्या पहिल्या अल्बम नंतर जेव्हा माझा दुसरा अल्बम आला, त्या काळात इंडिपेंडंट संगीत फार चालायचं नाही. कारण तेव्हा MP3 आणि संगीताची पायरसी जास्त चालायची. त्यामुळे फक्त चित्रपटांमधील संगीतच चालायचे. पॉप संगीत आणि गैर-फिल्मी गाणी जणू संपली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी, युट्यूबमुळे हनी सिंग आणि बादशाह यांनी पुन्हा मूळ संगीत आणि इंडी म्युझिक आणलं. मला चित्रपटांमध्ये गाणी गायला खूप आवडतं. त्यामुळे त्याचं महत्त्व कायम राहील. सध्या तरी मी अशा परिस्थितीत आहे की मला कोणाला फोन करून काम मागावं लागत नाही. मी आता एक प्रस्थापित गायक आहे. लोक मला ओळखतात, पाहतात आणि ऐकतात. जर कोणाला मी आठवत असेल, तर ते मला नक्कीच पार्श्वगायनासाठी बोलावतील.”
टीव्हीपासून दूर राहण्याचा निर्णय जाणीपूर्वक घेतला होता – अभिजीत सावंत
इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजित सावंतने ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये नशीब आजमावलं. गायना व्यतिरिक्त इतर रिअॅलिटी शो निवडण्यामागचं कारण सांगत अभिजित म्हणाला, “मी टेलिव्हिजनचं बाळ आहे. गायक आणि कलाकार म्हणून माझा जन्म टीव्हीवरच झाला. त्यामुळे माझ्यासाठी टीव्हीपासून लांब राहणं थोडं कठीण आहे. मी जाणीवपूर्वक टीव्हीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चुकीचा निर्णय होता. मला वाटलं की मी परत यायला पाहिजे, म्हणून मी इतर शो केले, कारण लोकांना मी आवडतो.”
“लोक माझ्याकडे फक्त रिअॅलिटी शोचा गायक म्हणून पाहत नाही. मी कायमच टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा राहिलोय. हा माझ्या करिअरसाठी मोठा फायदा आहे. मी ब्रेक घेतला कारण मला पार्श्वगायनात जायचं होतं, पण मग मला जाणवलं की मी टीव्हीवरूनच सुरुवात केली होती, त्यामुळे इथे परतायला हवं”, असं अभिजीतने नमूद केलं.
