Abhijeet Sawant Village, Kokan Trip : एप्रिल-मे महिन्यात मुंबईतील कोकणवासी आवर्जून गावची वाट धरतात. सलग सुट्ट्या असल्याने या काळात गावची पूजा, लग्नसमारंभ आयोजित केले जातात. मराठी मनोरंजनविश्वातील निखिल बने, मुग्धा-प्रथमेश, अंशुमन विचारे, संतोष जुवेकर, अभिजीत केळकर असे बरेच कलाकार मूळचे कोकणातले आहेत. हे कलाकार गणेशोत्सव, शिमगा आणि त्यांच्या शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळाल्यावर थेट गावी कोकणात पोहोचतात.

‘इंडियन आयडल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता मराठमोळा लोकप्रिय गायक अभिजीत सावंत देखील नुकताच कोकणात पोहोचला आहे. अभिजीत आपल्या कुटुंबासह गावी मस्त एन्जॉय करत असल्याचं त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. गावी खळ्यात ( अंगणात ) बसून मस्त चहाचा आस्वाद घेणं, संपूर्ण गावात भटकंती करण, लालपरीने प्रवास या सगळ्याची झलक अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

अभिजीत आपल्या लेकीला घेऊन गावच्या समुद्रकिनारी, नदीवर आणि गावच्या काजूच्या बागेत देखील गेला होता. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस दूर गावी गेल्यावर सर्वांचं मन प्रसन्न होतं. म्हणूनच अभिजीतने “सुख म्हणजे गावाकडचा प्रवास…कोकण ट्रिप” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

अभिजीतचं गाव कोकणात गोवळ येथे आहे. हे गाव महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये स्थित आहे. अभिजीतच्या गावी आंबा, नारळ अन् काजूची झाडं…घराच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर अन् घरापासून काही अंतरावरच सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळतो.

दरम्यान, मराठमोळा गायक अभिजीत सावंत भारताचा पहिला इंडियन आयडॉल ठरला होता. हा शो जिंकल्यावर त्याने ‘आपका अभिजीत सावंत’ हा म्युझिक अल्बम लॉन्च केला होता. या अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अभिजीतचं ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं सर्वत्र तुफान गाजलं होतं. अगदी आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

अभिजीत सावंतच्या सध्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, गाण्यांव्यतिरिक्त अभिजीत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता. तर, यानंतर अभिजीतने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात सुद्धा सहभाग घेतला होता. यासह ‘बिग बॉस’नंतर अभिजीतचे अनेक नवनवीन म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.