दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर रंगभूमीही गाजवली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा 'ती सध्या काय करते' चित्रपट बराच गाजला. अभिनय या चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. नुकतंच त्याने झी मराठीच्या 'डान्स महाराष्ट्र डान्स' कार्यक्रमात बोलताना वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनय बेर्डेच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतोय. 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या मंचावर एका सेगमेंटमध्ये अभिनय बेर्डेने त्याच्या दिवंगत वडिलांना एक कॉल केला. त्याचा हा इमोशनल व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी बोलताना दिसतोय. तो म्हणतो, "बाबा तुम्ही मला सांगायचा मला आठवतंय, भूमिका कुठलीही असो. हजार टेन्शन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकिटांबरोबर मन भरून लाफ्टर घेऊन गेला पाहिजे. पंच बोललेल्या वाक्यात नाही. तो न बोललेल्या दोन वाक्यांमधल्या टायमिंगवर असतो. अभिनय ते टायमिंग ओळख. अभिनय प्रेक्षकांचा झाला पाहिजे तरच प्रेक्षक अभिनयचे होतील." आणखी वाचा- लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? दिसणार प्रभाससोबत ‘या’ चित्रपटात? याच व्हिडीओमध्ये अभिनय पुढे म्हणतो, "बाबा आज मला तुमचं बोलणं कळतंय. एक काळ होता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता. बाबा एक वचन देतो. त्या लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा अभिनय महाराष्ट्र उद्याही लक्षात ठेवेल. आय लव्ह यू बाबा." अभिनय बेर्डेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. आणखी वाचा- स्वप्नाचा नक्षीदार प्रवास; ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख दरम्यान अभिनय बेर्डेच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसह 'मन कस्तुरी रे' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तेजस्वी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना दिसणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.