रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री जिनिलीया देशमुख या दोघांनी रितेश होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला उपस्थिती लावली होती. यावेळी या दोघांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिषेकने या कार्यक्रमात रितेशचं मनापासून कौतुक केलं. तसेच या चित्रपटासाठी रितेशने जवळपास २० वर्षे मेहनत घेतल्याचं त्याने सांगितलं. अभिषेक ज्याप्रकारे आपुलकीने रितेशच्या प्रत्येक कामाचं कौतुक करत होता…हे पाहून जिनिलीया भावुक झाली होती, तिचे डोळे पाणावले.
अभिषेक बच्चन म्हणाला, “मी आज तुम्हाला रितेशबद्दल काहीतरी सांगणार आहे…आज वहिनी पण इथेच आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने मी रितेशकडून अनेक गोष्टी शिकलो. तो जवळपास २०-२५ वर्षांपासून या चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत. मी शूटिंगदरम्यान जे-जे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रितेशकडे होती… असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर रितेश देऊ शकला नाही, इतका त्याने अभ्यास केला होता. त्याने या चित्रपटासाठी खरंच खूप मेहनत घेतलीये…रितेशसाठी हा फक्त एक चित्रपट नाहीये तर, त्याने यामधली प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने केलीये. अनेकदा मी सेटवर बसून फक्त रितेश काय-काय करतोय त्याच्याकडे बघत बसायचो. कारण, त्याच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे.”

“राजा शिवाजी’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर सादर करण्यात येत आहे. मी आज तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना एक गोष्ट जरूर सांगेन…तुम्ही हा सिनेमा नक्की बघा…! तुमचेही डोळे पाणावतील, तुम्ही सुद्धा भावुक व्हाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला देखील अभिमान वाटेल.” असं अभिषेकने सांगितलं.
तो पुढे म्हणाला, “रितेश मला माझ्या भावासारखा आहे. जेव्हा कधी तो चित्रपट बनवेल…त्या सिनेमात मला लहानशी तरी भूमिका साकारण्याची संधी मिळावी अशी माझी फार इच्छा होती. रितेश यांनी आधीचे जे दोन सिनेमे बनवले, त्यात यांनी मला काम दिलं नाही…’वेड’ सिनेमात मी नव्हतो पण, जिनिलीया होती ही आनंदाची गोष्ट आहे. पण, आता ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या निमित्ताने रितेशने मला छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजेंच्या भूमिकेसाठी विचारलं….अर्थातच ही संधी माझ्यासाठी खूप मोठी होती.”

“रितेश माझा लहान भाऊ आहे…आमचं बॉण्डिंग हे फार वेगळं आहे. जेव्हा त्याने या सिनेमात माझा पहिला शॉट ओके केला…तेव्हा माझ्या मनात एकच भावना आली ती म्हणजे…माझा भाऊ आता खूप पुढे जाणार आहे. त्याने खरंच खूप छान काम केलं आहे.” अशा भावना अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या.
