Aboli Fame Komal Kumbhar Shared Her Struggle Story : बऱ्याचदा कलाकारांना अभिनय क्षेत्रात खूप संघर्ष करावा लागतो. काहींना तर घरच्या मंडळींकडूनच विरोध होतो. त्यामुळे घरातूनच त्यांचा संघर्ष सुरू होतो. असंच काहीसं झालं लोकप्रिय मराठी अभिनेत्री कोमल कुंभारबरोबर ‌. कोमलने ‘सहकुटुंब सहपरिवार’ आणि ‘अबोली’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे कोमल कुंभार. या अभिनेत्रीनं याच मालिकेच्या प्रोमोआधी तिच्या वडिलांनी तिला खूप मारलं होतं, याबद्दलचा प्रसंग एका मुलाखतीत सांगितला आहे. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी घरच्यांकडून विरोध होता आणि त्यात घरच्यांना प्रियकराबद्दलही सांगितल्यानंतर कोमलवर तिचे कुटुंबीय खूप रागावले होते. ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना अभिनेत्रीनं तिच्या प्रेमकहाणीबद्दल आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच्या संघर्षाबद्दलची माहिती दिली आहे.

कोमलने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

कोमल कुंभारनं २०२५ मध्ये अभिनेता, लेखक व दिग्दर्शक गोकुळ दशवंतशी लग्न केलं. दोघांचा प्रेमविवाह झाला आहे. कोमलच्या घरच्यांना जेव्हा त्यांच्या प्रेमाबद्दल कळलं तेव्हा ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या प्रोमोचं शूटिंग होतं. त्यावेळी कोमलच्या घरच्यांनी तिला खूप विरोध केला आणि कोमलला मारहाणही केली. कोमलनं सांगितलं की, तिच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगणार आहे याबद्दल गोकुळला आधी कुठलीही कल्पना दिली नव्हती. कोमल याबद्दल म्हणाली, “मला आठवतंय रविवारचा दिवस होता. आमचं दुकान आहे, तर तिथे बाजार भरला होता. माझ्या घरच्यांना सांगितलं की, असं आहे की, मला मुंबईला जायचंय; पण ते मला सोडतच नव्हते. माझी आई मला जे आपल्याला पटतच नाही, ते करायचं कशाला, असं सांगत होती आणि तिनं माझ्या मामालाही बोलावून घेतलेलं जेणेकरून तो माझी समजूत काढेल; पण ते सगळेच बाजूला राहिले आणि दुसरं काहीतरी घडलं.”

कोमल पुढे म्हणाली, “मी मुंबईला शूटिंगसाठी जाण्याचा हट्ट धरल्यानंतर माझ्या आईला संशय आला की, ही इतका का हट्ट करत आहे. तेव्हा तिनं मला विचारलं की, तुझं बाहेर काही आहे का? आणि मी म्हटलं हो. मला माहीत नाही की, ते बोलायला हवं होतं की नाही; पण मी सांगून टाकलं. कारण- कधीतरी ते सांगावं लागणार होतं. तेव्हा मला पहिल्यांदा खरंच प्रेमामध्ये ताकद असते हे जाणवलं. मी घरी याबद्दल सांगितलं त्यावेळी भयाण शांतता निर्माण झाली. माझ्या आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि माझा मामा वडिलांकडे गेला आणि त्यांना त्यानं सगळं सांगितलं. त्यानंतर माझे वडील वर आले आणि त्यांच्या हातात तेव्हा पाइप होता.”

वडिलांनी पाइपने मारलं – कोमल

कोमल तो कठीण प्रसंग सांगताना पुढे म्हणाली, “तेव्हा माझ्या वडिलांनी मला त्या पाइपने मारलं; पण खरं तर त्यात त्यांचा दोष नाहीये. त्यांना माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती म्हणून त्यांचा राग अनावर झाला.” यावेळी गोकुळ म्हणाला, “तिला खूप मारलं होतं तिची पूर्ण पाठ काळी निळी झाली होती. तिला इतकं मारलं की, शेवटी तिचा भाऊ मध्ये पडला आणि म्हणाला की, बस करा नाही, तर तिचा जीव जाईल आता.” कोमल याबद्दल पुढे म्हणाली, “अंगावर वळ होते सगळे आणि त्यातच मी प्रमोचं शूटिंग केलं. मला त्यावेळी आमच्या घरातील अनेकांनी सांगितलं की, नको करूस असं; पण मी म्हटलं की, नाही जर केलंय, तर ते मी शेवटपर्यंत निभावणार. त्यावेळी आमच्या घरातलं वातावरण खूपच विचित्र झालं होतं; पण मग शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरच्यांनी मला तू जा आता, असं म्हटलं. मी घरातून हाकलून दिलं, असं म्हणणार नाही; पण जवळपास त्यांनी तू आता आमची राहिली नाहीस. तू जा, असं म्हटलं.”