Abhijeet Kelkar Hometown : मराठी मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार हे मूळचे कोकणातले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी, शिमग्याला तसेच लागोपाठ सुट्ट्या मिळाल्यावर हे सगळे कलाकार एन्जॉय करण्यासाठी आपल्या गावी जातात. गावी गेल्यावर मन शांत होतं, गावच्या वातावरणात प्रसन्न वाटतं त्यामुळे वर्षातून एकदा तरी गावी गेलं पाहिजे असं सर्वांना वाटतं. तितीक्षा व खुशबू तावडे, निखिल बने, प्रसाद खांडेकर, संतोष जुवेकर, अंशुमन विचारे, छाया कदम अशा बऱ्याच कलाकारांनी आपल्या गावच्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आता यांच्या पाठोपाठ अभिनेता अभिजीत केळकरने सुद्धा त्याचं कोकणातील गावचं घर सर्वांना दाखवलं आहे.
अभिजीत केळकरचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तो सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अनेक सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर तो नेहमीच आपली स्पष्ट मतं मांडताना दिसतो. अभिजीत नुकताच त्याच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत कोकणात पोहोचला आहे.
अभिजीतचं गाव कोकणात रत्नागिरीत आहे. याठिकाणी त्यांचं छान टुमदार घर आहे. याची झलक अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिजीतच्या गावच्या घरात गेटमधून एन्ट्री घेताच सर्वप्रथम डाव्या बाजूला जनावरांचा गोठा पाहायला मिळतोय. तर, या गोठ्याच्या बाजूलाच पुढे अभिजीतचं कौलारू घर आहे. या टुमदार घराच्या आजूबाजूला हिरवीगार झाडं आहेत. कोकणात घराच्या बांधकामासाठी प्रामुख्याने स्थानिक जांभा दगड (चिरा) वापरला जातो. अभिजीतचं घर सुद्धा चिऱ्यांनीच बांधल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिजीत म्हणतो, “माझं कोकण…माझी रत्नागिरी! हीच माझी काशी, हीच माझी पंढरी” हे कॅप्शन वाचूनच अभिनेत्याला त्याचं गाव किती प्रिय आहे याची प्रचिती येते.
अभिजीतने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा पाऊस पाडला आहे. “किती छान आहे घर”, “गाव असावं तर असं”, “कोकण म्हणजे स्वर्ग” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. दरम्यान, अभिजीत केळकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आजवर त्याने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. काही महिन्यांपूर्वीच तो ‘शंकराचा बाळ आला’ या म्युझिक अल्बममध्ये झळकला होता. याशिवाय अभिजीतने अलीकडेच ‘मनपसंद की शादी’ या हिंदी मालिकेत सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

