"२० टक्के वाढीसाठी..." 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज | Actor Comedian Onkar Bhojane Quit Maharashtrachi Hasyajatra fans angry after watching Fu Bai Fu episode nrp 97 | Loksatta

“२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज

“तू इथे येऊन फार मोठी चूक केली आहेस…”

Onkar Bhojane
ओंकार भोजने

झी मराठीवरील ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात अभिनेता ओंकार भोजनेही सहभागी झाला आहे. त्याचे कॉमेडी करतानाचे व्हिडीओही समोर आले आहेत. मात्र ओंकार भोजनेचे चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार भोजने हा कायमच चर्चेत असतो. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. त्याने त्याच्या विनोदी अभिनय शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. सध्या तो झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात झळकत आहे. त्या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण

झी मराठीने नुकतंच त्यांच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओंकार भोजने, आशिष पवार, सागर कारंडे आणि पंढरीनाथ कांबळे हे विनोदवीर स्किट सादर करताना दिसत आहे. जवळपास ४ मिनिटांचा हा व्हिडीओ आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. “ओंकार भोजने, फर्स्ट टाइम फक्त्त तुझ्यासाठी हा प्रोग्राम बघायला आले…अजिबात आवडलं नाही, तू इथे येऊन फार मोठी चूक केली आहेस…असं माझं वैयक्तिक मत आहे.. फक्त्त इथे येऊन तू तुझं करिअर बरबाद करू नकोस… बाकी पुढे तुझं नशीब. स्वामी तुला लवकरच सुबुद्धी देवोत, ॐ श्री स्वामी समर्थ” असे एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा : विशाखा सुभेदारपाठोपाठ आणखी एका विनोदवीराची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’मधून एक्झिट, चर्चांना उधाण

तर एकाने “२० टक्के वाढीसाठी ८० टक्के करिअर खराब होतंय”, असे म्हटले आहे. “झी मराठी वाहिनीचे विशेष आभार… महाराष्ट्राची हास्यजत्राचा आदार कित्येक पटीने वाढला. ओंकार भावा चूकलास”, असे एक व्यक्ती म्हणाला. तर एकाने “ओमकार भोजने मला फार वाईट वाटतेय तुझा निर्णय अजुनही बदल. हास्यजत्रामध्ये आम्हीं तुला मिस करतोय अग अग आई….., आणि अजुन खूप काही प्लीझ वेळ गेली नाही. हास्यजत्रेमध्ये परत ये”, अशी विनंती एक नेटकरी करताना दिसत आहे.

दरम्यान ओंकार भोजनेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सोडण्याचा निर्णय त्याच्या चाहत्यांना अजिबात पटला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यावर टीका केली असून हास्यजत्रामध्ये परतण्याची मागणी केली आहे. तर काहींनी ‘तू चुकीचा निर्णय घेतलास’ असे म्हटले आहे. मात्र अद्याप यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-11-2022 at 14:56 IST
Next Story
जितेंद्र जोशीने केला ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश; सदस्यांना टास्क देत म्हणाला, “तो मार…”