२००१ मध्ये ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तुफान लोकप्रिय झाली. या मालिकेची कथा आणि सर्व कलाकारांचा अभिनय यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजही प्रेक्षक या मालिकेची आठवण काढताना दिसतात. तर आता अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या मालिकेदरम्यानची एक आठवण शेअर केली आहे.
या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. या सर्वांनी नुकतीच ‘द क्राफ्ट’ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. यावेळी या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदेही उपस्थित होते. या मुलाखतीमध्ये त्या सर्वांनी या मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणी जागवल्या.




आणखी वाचा : अक्षया देवधरची नवी सुरुवात! पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी आबा टिपरे हे पात्र साकारलं. या भूमिकेसाठी त्यांचं सर्वत्र कौतुक झालं. पण ही भूमिका साकारणं सोपं नव्हतं. आबा टिपरे यांना जाड भिंगाचा चष्मा या मालिकेत दाखवला होता. या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांनी तब्बल १६ नंबरचा चष्मा घालून काम केलं, असा खुलासा त्यांनी केला. याबद्दल बोलताना राजन भिसे म्हणाले, “त्यांनी या मालिकेत जो चष्मा वापरलाय तो जर आपण घातला तर चक्कर येईल. चष्मा घालून ते सीन कसा करायचे हा मला प्रश्नच आहे. कारण त्या चष्म्याचा नंबर इतका होता की त्यातून काहीच दिसायचं नाही.” तर यावर दिलीप प्रभावळकर म्हणाले, ” त्या चष्म्याचा नंबर १६ होता. कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेली एखादी व्यक्ती जसा चष्मा घालायची तसा तो होता.”
हेही वाचा : ‘दिल, दिमाग और बत्ती’मध्ये दिलीप प्रभावळकर-वंदना गुप्ते नव्या भूमिकेत
तर पुढे केदार शिंदे म्हणाले, “प्रत्येक सीन करण्याच्या आधी चष्मा काढून पावलं मोजायचे. मी जर त्यांना हालचाली सांगितले असतील तर त्या आधी चष्मा काढायचे आणि सर्व जागा पाहून ठेवायचे. मग तो सीन करायचे.” तर आता त्यांचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. यावर प्रतिक्रिया देत या मालिकेचे चाहते त्यांच्या या कामाचं खूप कौतुक करत आहेत.