Lakshmi Niwas Hindi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेची मूळ कथा झी कन्नडावरील ‘लक्ष्मी निवासा’ या कन्नड मालिकेवर आधारित आहे. या कौटुंबिक मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता आता यावरूनच हिंदी मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिका हिंदीत ‘झी टीव्ही’वर प्रसारित केली जाते. रिमेक असल्याने याचं मूळ कथानक सारखंच आहे.
हिंदी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनीची एन्ट्री झाली होती. तो आदित्य साहू ही भूमिका साकारत होता. आदित्य हा मोठ्या कंपनीचा मालक असतो. त्याची आई राधिकाला लग्नासाठी मागणी घालते. पण, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. आदित्य साहूचा अपघात घडवून आणला जातो. यात त्याच्यासह त्याच्या आईचा देखील मृत्यू झाल्याचं मालिकेत पाहायला मिळालं.
खरंतर, गश्मीरला मालिकेत पाहून त्याचे चाहते प्रचंड आनंदी झाले होते. पण, अवघ्या काही दिवसांतच त्याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. याबद्दल गश्मीरला ‘आस्क मी सेशन’मध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे. “तुम्ही लक्ष्मी निवास मालिका का सोडली?” यावर अभिनेता म्हणाला, “तो फक्त एक कॅमिओ होता. मालिकेत ती भूमिका थोड्याच कालावधीसाठी असणार होती.”

मराठीमध्ये सुद्धा प्रेक्षकांना सारखाच ट्विस्ट पाहायला मिळाला होता. भावना अन् श्रीकांतचं लग्न ठरतं आणि लग्नाच्या दिवशी श्रीकांतचा रवीकडून अपघात घडवला जातो. मराठी मालिकेत श्रीकांत ही भूमिका अभिनेता राजेश शृंगारपुरेने साकारली होती. श्रीकांतच्या अपघाताच्या सीक्वेन्सनंतर राजेशची सुद्धा मालिकेतून एक्झिट झाली होती. अगदी त्याचप्रमाणे आदित्य साहूच्या मृत्यूचा सीन दाखवल्यामुळे गश्मीरने सुद्धा या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
दरम्यान, हिंदी ‘लक्ष्मी निवास’ मालिका ‘झी टीव्ही’वर १२ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही मालिका हिंदीतही रात्री आठ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये मानसी जोशी रॉय, राजेंद्र चावला, अक्षिता मुदगल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

