Gaurav More On Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. त्याची ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’, या वाक्याने अनेकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. विनोदाच्या अनोख्या शैलीने त्याने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने या शोमधून एक्झिट घेतली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर गौरवने ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. शिवाय मधल्या काळात त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो सोडण्याविषयी त्याने याआधीही मुलाखतींमधून सांगितलं आहे. अशातच त्याने पुन्हा एकदा शो सोडण्याविषयी पुन्हा एकदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“सारखं-सारखं तेच व्हायला लागलं यामुळे…”

9 Minds Creation या युट्युब चॅनलला गौरवने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो का सोडला? असं विचारण्यात आलं. त्यावर गौरव उत्तर देत म्हणाला की, “तुमचं काम शो सारखंच होतंय आणि मला भूमिका पण तशाच यायला लागल्या. मला फोन यायचा, ‘तुमची भूमिका मस्त आहे. तुम्ही येता… मग कॉमेडी होते आणि मग तुम्ही खूप कॉमेडी करता.’ काय करायचं मी? आणखी एक फोन यायचा, ‘सर, तुम्ही या तारखेला आहात का? तुमच्यासाठी एक मस्त भूमिका आहे. हिरो आणि हिरोईन असतात. त्यांच्या घरात प्रॉब्लेम होतात आणि त्यांच्यामध्ये तुम्ही येता. मग कॉमेडी होते. सारखं-सारखं तेच व्हायला लागलं. यामुळे मला वाटलं की, आपण ब्रेक घ्यायला पाहिजे. म्हणून मी थांबलो.”

“हिंदीतून समोरून ऑफर आलेली त्यामुळे…”

यानंतर तो म्हणाला, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोनंतर वर्षभर मी काहीच केलं नाही. फक्त ‘मॅडनेस मचायेंगे’मध्ये काही भागांचं शूटिंग केलं कारण मला हिंदीतून समोरूनच ऑफर आलेली. त्यामुळे मी तो शो केला. बाकी मला हे करायचं नाही, असं माझं काहीच नव्हतं.” दरम्यान, आणखी एका मुलाखतीत त्यानं स्वत:ची निर्मिती संस्था सुरू करायची असल्याचं इच्छासुद्धा व्यक्त केली होती.

“स्वत:ची निर्मिती संस्था सुरू करायची आहे”

याबद्दल तो “मला स्वत:ची निर्मिती संस्था सुरू करायची आहे. आता ते कधी होईल? कसं होईल? याबद्दल मला माहीत नाही. पण ते डोक्यात आहे आणि करायचं तर आहेच. मीच मुख्य भूमिकेत असेन तेव्हा निर्माता म्हणून काम करेन. तसंच मला दिग्दर्शनसुद्धा करायचं आहे”, असं म्हणाला होता. काही दिवसांपूर्वीच तो झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या सीझनमध्येही पाहायला मिळाला होता.