Lalit Prabhakar On The Sequel Of Julun Yeti Reshimgathi : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका आठवत असेलच. आजही या मालिकेचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. मालिकेतली मेघना आणि आदित्य यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. तसेच देसाई कुटुंबाची गोष्टही प्रत्येकाला आपलीशी वाटली होती. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेनंतर ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे दोघंही आपल्या करिअरमध्ये खूप पुढे गेले आहेत; पण तरीसुद्धा त्यांना या मालिकेबद्दल अनेकदा विचारणा होत असते. 

अशातच ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग यावा का? यावर ललितनं त्याचं उत्तर दिलं आहे. अभिनेता सध्या त्याच्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून हाऊसफुल्ल असा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ललित प्रमोशन करत आहे. अशातच एका मुलाखतीत त्यानं ‘जुळून येती रेशीमगाठी’च्या दुसऱ्या भागाबद्दल प्रतिक्रिया दिली.   

‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग यावा असं वाटतं का, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर ललित म्हणाला, “मला असं वाटत नाही. त्या वेळेस ती जादू होऊन गेली. त्या त्या वेळेची एक ‘एनर्जी’ असते. त्याला आता कुठे धक्का लागायला नको. ती खूप छान मालिका होती. तो काळ तसा होता. दिग्दर्शक तसे होते. लिखाणही तसं झालं होतं. हे सगळं तेव्हा खूप उत्तम पद्धतीनं जुळून आलं होतं.” 

पुढे त्या मालिकेच्या आठवणी सांगताना ललित म्हणाला, “तेव्हाच्या मालिकांत फरक होता. आमच्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, आमच्या मालिकेत कुणी व्हिलन नव्हतं. नकारात्मक भूमिका करणारं असं कुणी पात्र नव्हतं. मालिकेत परिस्थितीच नकारात्मक असायची. एकत्र कुटुंबावर आधारित ती मालिका होती. त्या मालिकेतल्या प्रत्येक भूमिकेमधला खरेपणा आजही टिकून आहे. तीच त्या मालिकेची खासियत होती. त्यामुळे ती मालिका लोकांच्या अजूनही लक्षात आहे. त्याशिवाय मालिकेचं लिखाण, दिग्दर्शन आणि कलाकारांनी आपापली भूमिका जिवंत केली.”

“माझ्या करिअरमध्ये ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका खूपच महत्त्वाची आहे. त्या मालिकेमुळे मी अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आदित्य  या पात्रावर त्यांनी भरभरून प्रेम केलं. अजूनही करीत आहेत. अजूनही आदित्य-मेघना जोडीचे इन्स्टाग्रामवर फॅन पेजेस आहेत, जे रोज नवनवीन व्हिडीओ बनवत असतात. त्यावर आम्हाला टॅग केलं जातं. अजूनही लोकांना आम्हाला एकत्र बघायचं आहे. आजही यूट्यूबवर अनेक प्रेक्षक ती मालिका बघतात. रोज मेसेजेस येत असतात की, आम्ही सात ते आठ वेळा ही मालिका पाहिली. हे प्रेम खूप जास्त आहे. त्यावर कशा पद्धतीनं व्यक्त व्हावं मला कळत नाही; पण या प्रेमानं मला भारावून जायला होतं”, हेही शेवटी तो म्हणाला.