Prasad Oak and Nitin Gadkari Video : २०१७ सालापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात गायन, नृत्य आणि इतर अनेक कलांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशातच यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचंही आयोजन करण्यात आलं होतं.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमाचं खासदार सांस्कृतिक महोत्सवात सादरीकरण करण्यात आलं होतं. त्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात अभिनेता-दिग्दर्शक आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील हास्यरसिक प्रसाद ओकनं नितीन गडकरी यांना काही प्रश्नं विचारले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील कलाकारांनी डान्स परफॉर्मन्स केले. तसेच सई ताम्हणकरनं नागपूरच्या खास भाषेत संवादही साधला. यावेळी प्रसाद ओकनं नितीन गडकरींना काही प्रश्न विचारले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक नितीन गडकरींना पहिला प्रश्न विचारतो, ‘जास्त प्रेम कशावर आहे? नागपूर की दिल्ली?’ ज्यावर नितीन गडकरी उत्तर देत म्हणतात, “नागपूर”. पुढे प्रसाद ओक दुसरा प्रश्न विचारतो, ‘जास्त प्रेम कशावर आहे? वडापाव की तर्री पोहे?’ या प्रश्नाचं उत्तर देत नितीन गडकरी म्हणतात, “तर्री पोहे”. नंतर प्रसाद ओक विचारतो, ‘तुम्ही रस्ते मार्गानं दिल्लीला लवकर पोहोचता की मुंबईला?’ त्यावर नितीन गडकरी उत्तर देतात, “आता मुंबईला लवकर पोहोचतो.” यावर प्रसाद प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला सांगतो आणि त्यांचं कौतुक करत म्हणतो, “टाळ्या व्हायला पाहिजेत. काही वर्षांपूर्वी मुंबईला पोहोचणं कठीण होतं; पण आता साहेबांमुळे ते सोपं झालं आहे.”
प्रसाद ओकनं नितीन गडकरींना विचारलेल्या प्रश्नांचा व्हीडीओ
प्रसाद ओक नितीन गडकरींना पुढचा प्रश्न विचारतो, ‘तुमचं जास्त प्रेम सिनेमावर आहे की नाटकावर?’ याचं उत्तर नितीन गडकरी ‘नाटक’ असं देतात. नंतर तो शेवटी त्यांना ‘सफारी की ब्लेझर? काय अधिक आवडतं?’ असं विचारतो, ज्यावर नितीन गडकरी ‘ब्लेझर’ असं उत्तर देतात आणि हसत हसत म्हणतात, “शासकीय सेवेत आजकाल चपरासीसुद्धा सफारी परिधान करतात.” ज्यावर उपस्थित आणि प्रेक्षकही हसतात.
दरम्यान, नागपूरमधील या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यंदाच्या या महोत्सवात अजय-अतुल, श्रेया घोषाल, विशाल मिश्रा, शंकर महादेवन यांनीही आपल्या गायनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनीसुद्धा नागपूरकरांचं खास मनोरंजन केलं.
