अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेतील संकर्षणाच्या भूमिकेला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संकर्षणसह त्याचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडेही उत्तम अभिनेता आहे. काही मालिकांमध्ये त्याने उत्तमोत्तम काम केलं. नुकतंच अधोक्षजने ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवर हजेरी लावली. यावेळी तो या मालिकेमधील मुख्य कलाकार श्रेयस तळपदेला भेटला. श्रेयसला भेटणं हे त्याचं स्वप्न होतं. याचबाबत अधोक्षजने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या…” मुलाच्या लग्नावरून शरद पोक्षेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला

अधोक्षजने श्रेयसबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं की, “२००५ साली मी नुकताच नववी पास करून दहावीच्या वर्गात गेलो होतो. तेव्हा बाबा बँकेत काम करत करत प्रायोगिक नाटकात आणि कधीकधी मराठी चित्रपटांमध्ये काम करायचे. मला आठवतंय, एकदा बाबा रजा घेऊन आठ दिवसांसाठी मुंबईला एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते. चित्रपटाचं नाव होतं ‘झुळूक’. त्यावेळी चित्रपट, चित्रपटांचं चित्रीकरण या सगळ्या गोष्टींचं खूप अप्रूप वाटायचं (ते आजही आहेच). ‘आपले बाबा चित्रपटामध्ये काम करत आहेत’ ही फिलिंगच खूप भारी होती.”

“मुंबईला गेल्यावर बाबांचा फोन आला, त्यांच्याकडून कळालं की चित्रपटामध्ये डॉक्टर गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.‌ त्यावेळी श्रेयस तळपदे हे नाव माझ्यासाठी अगदीच नवीन होतं. बाबा तेव्हा बरेचदा सांगायचे, श्रेयस तळपदे चित्रीकरणादरम्यान बॉलिंगची प्रॅक्टिस करायचा. त्यानंतर काहीच महिन्यांनी श्रेयस तळपदेचा ‘इक्बाल’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा ती प्रॅक्टिस कशासाठी होती, ते समजलं! ‘इक्बाल’ पाहिला आणि तेव्हापासून मी त्याचा फॅन झालो. त्यादरम्यान मीसुद्धा क्रिकेट खेळायचो. त्यामुळं त्याची भूमिका मला जास्तच जवळची वाटत होती. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात त्याच्या ‘आशाये’ गाण्यानं होते. नंतरही त्याचं प्रत्येक काम मी मन लावून पाहिलं. माझ्या बाबांनी इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम केलंय हे फिलिंग खूप भारी होतं. मलापण कधीतरी त्याला भेटता यावं अशी इच्छा तेव्हापासून मनामध्ये होती.”

आणखी वाचा – “विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली

पुढे तो म्हणाला, “‘इक्बाल’नंतर मात्र तो हिंदी चित्रपटसृष्टीतच जास्त कार्यरत राहिला आणि अनेक वर्षं त्याला भेटण्याची इच्छा फक्त इच्छाच राहिली. मग अखेर पंधरा वर्षांनंतर संकर्षणच्या निमित्तानं ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवर ‘दि श्रेयस तळपदे’च्या भेटीचा योग आला. त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्त्व, त्याचं हास्य व साधेपणा याचं कॉम्बिनेशन पाहून मला खूप छान वाटलं आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्याचा मोह आवरला नाही. ही त्याची आणि माझी पहिली भेट. पुढे आमच्या घरगुती समारंभाचा भाग होण्याइतका तो जवळचा झाला आणि पर्यायानं ‘दि श्रेयस तळपदे’चा ‘श्रेयस दादा’ झाला. भविष्यात त्याच्यासोबत कामं करण्याचीही संधी मिळेल, या ‘आशाये’ आहेतच, पण ही भेट खूप खास होती, हे मात्र खरं!” संकर्षणचा भाऊ श्रेयसला भेटल्यानंतर अगदी भारावून गेला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sankarshan karhade brother adhokshaj karhade visit majhi tujhi reshimgath serial set meet shreyas talpade see details kmd
First published on: 30-11-2022 at 11:11 IST