Saorabh Choughule post on Ajinkya Rahane Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आणि महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने ३० जुलै २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. अजिंक्यने निवृत्ती जाहीर केल्यानंतर ‘जीव माझा गुंतला’ फेम मराठी अभिनेता सौरभ चौघुलेने एक खास पोस्ट केली आहे. सौरभने अजिंक्यबरोबरचा बालपणीचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
सौरभ चौघुले व अजिंक्य रहाणे रेल्वे ग्राउंड आणि डोंबिवली जिमखाना इथं एकत्र क्रिकेट खेळायचे. तेव्हाचाच हा एक फोटो आहे. फोटो कपाट साफ करताना सापडला, पण कधीच पोस्ट केला नाही, असं सौरभने सांगितलं. एक डोंबिवलीकर म्हणून तुझा सगळ्यांपेक्षा थोडा जास्त अभिमान वाटत असल्याचं सौरभने लिहिलं. पाहुयात सौरभ चौघुलेने अजिंक्य रहाणेसाठी लिहिलेली खास पोस्ट…
Hi अजिंक्य,
इतके वर्षे हा जपून ठेवलेला फोटो, मागच्या वर्षी कपाट साफ करताना सापडला. अपलोड करायची खूप इच्छा होती पण माहीत नाही का, मी कधी केला नाही.
आपण रेल्वे ग्राउंड आणि त्या नंतर डोंबिवली जिमखाना इथे एकत्र खेळलो. खातू सरांसोबत तांडेल सरांकडे शिकायची संधी मिळाली.
तू लहान असताना पण नेहमी मोठ्या प्लेअर्सच्या नेटमध्ये प्रॅक्टिस करायचास आणि तुला बॉलिंग करायला त्यांना सुद्धा खूप मजा यायची, कारण तू प्रत्येक बॉल बॅटने भिरकावून लावायचास.
आम्हाला नेहमी सांगितलं जायचं “अजिंक्य कडे बघा तो कसा खेळतोय, त्याला ऑब्झर्व्ह करा….”
मी अजिबात चांगला खेळायचो नाही.
जेव्हा क्लब लेव्हल किंवा स्टेट लेव्हल मॅचेस असायच्या तेव्हा तू १४ वर्षांचा होतास. तू अंडर १४ नाही तर नेहमी अंडर १९ मध्ये खेळायचास आणि तुझे बाबा आवर्जून तुझ्या प्रत्येक मॅचला हजर असायचे.
मला आठवतंय २०११ मध्ये जेव्हा तू debut केलंस तेव्हा मी २३ वर्षांचा असेन आणि तू ही.जेव्हा पहिल्यांदा तुझं नाव ‘इंडियन टीम’ मध्ये आलं खूप खूप अभिमान वाटला तुझा, जास्त करून माझ्या आई बाबांना. तेव्हा एकदम टिपिकली मला आई बोली होती “बघ तो कुठे पोहचला नाहीतर तू!”
आज तुझा व्हिडीओ पाहिला आणि भरून आलं, खास करून जेव्हा तू डोंबिवलीचं नाव घेतलंस. एक मराठी मुलगा शून्यातून वर आला आणि त्याने आज स्वतःला सिद्ध केलं. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे अजिंक्य. Thank you for every single innings you played.
Every single Indian is proud of you…आणि मला एक डोंबिवलीकर म्हणून सगळ्यांपेक्षा थोडा जास्त अभिमान आहे!!
….आणि ह्याच फोटोत बरोबर मध्ये उभा असलेला टीम इंडियासाठी खेळलेल्या क्रिकेटरला तुम्ही ओळखलं का?
(एक गोलंदाज)
अजिंक्य रहाणे निवृत्तीच्या व्हिडीओत काय म्हणाला?
अजिंक्य रहाणे व्हिडीओत म्हणाला, “डोंबिवलीतून मुंबईत लोकलने येत क्रिकेट खेळणाऱ्या त्या मुलाचं देशासाठी खेळायचं स्वप्न पूर्ण झालं. भारतासाठी खेळणं हा माझ्यासाठी अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद असे. बीसीसीआय, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि सहकारी खेळाडू यांच्या ठोस पाठिंब्यामुळेच भारतासाठी नियमितपणे खेळू शकलो. प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि शेवटही असतो. माझ्यासाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं पण थांबण्याची हीच योग्य वेळ आहे. बॅटिंग करताना मी टायमिंगला नेहमीच महत्त्व दिलं.”
“मुंबई क्रिकेटने मला घडवलं. माझे आईबाबा, पत्नी आणि मुलं सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले. मी ही वाटचाल करू शकलो कारण तुमचं प्रेम. तुम्ही कधीच परकं मानलं नाहीत, सदैव साथ दिलीत,” असं म्हणताना अजिंक्य रहाणे भावुक झाला.
