Sheezan Khan on Sanchita Ugale Death: ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया’ या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री संचिता उगले हिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. संचिताच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर दिला श्रद्धांजली वाहिली जात आहे. संचिताच्या आकस्मिक जाण्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि सहकलाकार सोशल मीडियावर “मी तिला फोन करायला हवा होता, आम्ही भेटणार होतो” अशा पोस्ट्स शेअर करून दुःख व्यक्त करत आहेत. यावर अभिनेता शीझान खानने नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत शीझानने विचारले, “ती व्यक्ती जिवंत असताना खरोखर तुमच्यापैकी किती जणांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता? गेल्यानंतर आठवण काढण्यापेक्षा ती जिवंत असताना तिच्याकडे दुर्लक्ष का केले?”

मंगळवारी शीझानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत संचिताच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. त्याने सर्वांना एक भावनिक सल्ला दिला. खूप उशीर होण्यापूर्वी आपल्या जवळच्या लोकांची विचारपूस करा आणि त्यांना पाठिंबा द्या, असं त्याने सांगितलं. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, “एखादा माणूस गेल्यावर प्रत्येक जण त्याची आठवण काढतो, पण मग तो जिवंत असताना त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं होतं? हा मोठा कठीण प्रश्न आहे.”

एखाद्याला गमावल्यानंतर लोक अनेकदा दुःख व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात, पण ते जिवंत असताना जेव्हा त्यांच्यामध्ये अंतर वाढू लागतं, तेव्हा ते नातं टिकवण्यासाठी किंवा संपर्कात राहण्यासाठी मात्र लोक प्रयत्न करत नाहीत, असं स्पष्ट मत शीझान खानने व्यक्त केलं.

श्रद्धांजलीच्या पोस्ट टाकणाऱ्यांना शीझान खानचा प्रश्न

व्हिडीओमध्ये शीझान खान म्हणाला, “माझा सर्वांना एक साधा प्रश्न आहे. जेव्हा एखाद्याचं निधन होतं, खासकरून जेव्हा एखादी तरुण व्यक्ती जाते, तेव्हा मला सोशल मीडियावर नेहमी अशाच प्रकारच्या पोस्ट्स पाहायला मिळतात- ‘मी त्याला/तिला फोन करायला हवा होता, मी तिथे असतो तर, आम्ही भेटणार होतो, हे कसं काय घडू शकतं?’ प्रत्येक वेळी मला एकच विचार येतो की, ती व्यक्ती जिवंत असताना तुमच्यापैकी किती जणांनी खरोखर संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता? ही बातमी समोर येण्यापूर्वी, किंवा ‘RIP’ च्या पोस्ट्स टाकण्यापूर्वी… त्याच्या आधी? तुम्ही शेवटचा प्रयत्न कधी केला होता त्या मित्राशी संपर्क साधण्याचा, गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यात थोडं अंतर आलं होतं? किंवा तुम्ही कधी फक्त त्याची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता का?”

माणूस गमावल्यावर दुःख व्यक्त करणं सोपं असतं

शीझानने लोकांना सांगितलं की वेळ असतानाच नात्यांची जबाबदारी घ्या. प्रेम व्यक्त करण्यासाठी, काळजी घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला गमवाण्याची वाट पाहू नका. “एखादी घटना घडून गेल्यावर त्यावर दुःख व्यक्त करणं खूप सोपं असतं. पण ती व्यक्ती जेव्हा तुमच्यासोबत असते, तेव्हा खरंच प्रयत्न करणं कठीण असतं. तुम्ही तो कठीण प्रयत्न कधी केला होता? म्हणूनच पुढच्या वेळी, ‘मी बोललो असतो तर…’ अशी स्टोरी सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी, स्वतःला एक प्रश्न विचारा की, ‘जेव्हा माझ्याकडे संधी होती, तेव्हा मी खरंच तसा प्रयत्न केला होता का?'” असं शीझान खान म्हणाला.

लोकांनी भावना व्यक्त करण्यास उशीर करणं थांबवावं आणि वेळीच आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधावा, जेणेकरून असं बोलायची वेळ येणार नाही, असं आवाहन शीझान खानने केलं.