Siddharth Khirid Wedding Photo : गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. त्यात एका अभिनेत्याचे नाव सामील झाले आहे आणि हा अभिनेता म्हणजे ‘फ्रेशर्स’ मालिका फेम सिद्धार्थ खिरीड. सिद्धार्थ नुकताच लग्नबंधनात अडकला आहे आणि त्याच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

‘फ्रेशर्स’, ‘मुलगी झाली हो’, ‘राणी मी होणार’ यांसारख्या मालिकांमधून सिद्धार्थ घराघरात लोकप्रिय झाला. आपल्या अभिनयाद्वारे सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अभिनयानं चर्चेत राहणारा सिद्धार्थ सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थनं सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. इतकंच नाही, तर त्यानं गर्लफ्रेंडला गोव्याच्या समुद्रकिनारी फिल्मी स्टाईलनं प्रपोज केलं होतं. त्यानंतर अखेर आज (२३ जानेवारी) तो लग्नबंधनात अडकला आहे.

सिद्धार्थनं गर्लफ्रेंड मैथिली भोसेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मैथिली भोसेकर ही डेंटिस्ट आहे. तसेच तिला मॉडेलिंगचीही आवड आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिनं सहभाग घेतला होता. ‘पॅरिस फॅशन वीक’मध्येही मैथिली झळकली आहे. तिनं मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२३ हा किताबही पटकावला आहे. दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे, तसेच मेंदी आणि हळदी सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या पहिल्या समोर आलेल्या फोटोमध्ये अभिनेत्याने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर धोतर घातलं आहे. त्याच्या डोक्याला मुंडावळ्यादेखील पाहायला मिळत आहेत. त्याच्या पत्नी मैथिलीनं नऊवारी साडी परिधान केली आहे आणि त्यावर साजेसे असे दागिनेसुद्धा परिधान केले आहेत.

Siddharth Khirid first wedding photo
अभिनेता सिद्धार्थ खिरीड अडकला लग्नबंधनात

लग्न लागताच सिद्धार्थ व मैथिली यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि हाच क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्स करीत प्रतिसाद देत आहेत. लग्नाचा फोटो व्हायरल होताच मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये सिद्धार्थ झळकलेला आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा या लोकप्रिय मालिकेतही तो पाहायला मिळाला.