सध्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळतोय, तर दुसरीकडे टीव्ही मालिकांची लोकप्रियता कमी होत आहे. अशातच आता व्हर्टिकल व्हिडीओ ड्रामामुळे कलाकारांसाठी कामाचा नवा पर्याय खुला झाला आहे. अभिनेता सूरज सोनिकच्या मते, मायक्रो-ड्रामामध्ये नर्स किंवा वॉर्ड बॉयसारखी छोटी भूमिका करणाऱ्या कलाकारालाही एका दिवसाच्या कामासाठी ५००० रुपये मिळू शकतात.

सूरजने सांगितलं की, मोठ्या चित्रपटात किंवा मोठ्या भूमिका न करता देखील त्याने १० वर्षांच्या करिअरमध्ये मुंबईत स्वतःचे घर घेतले. गेल्या वर्षभरात त्याने १०० हून जास्त व्हर्टिकल सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच जाहिरातीसाठी तो एक लाख रुपयांपर्यंत मानधन घेतो.

सूरज सोनिक १२ तासांत ५० हजार कमावतो

सलमान खानच्या सुल्तानमधून सूरजने करिअरची सुरुवात केली होती. त्यासाठी त्याला पर-डे १००० रुपये मिळायचे. “कोणताही अनुभव नसलेला नवीन अभिनेता मुंबईत सहजपणे ५०,००० रुपये कमवू शकतो. यासाठी त्याला प्रत्येकी ५,००० रुपये मिळवून देणारी १० कामं शोधावी लागतील. थोडाफार अनुभव असलेला अभिनेता केवळ ५ कामं करून तितकेच पैसे कमवू शकतो. तर, माझ्यासारखा अभिनेता, ज्याने २०० जाहिराती केल्या आहेत, तो १२ तासांत ५०,००० रुपये कमवतो आणि एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी १ लाख रुपये मानधन घेतो,” असं सूरज म्हणाला.

सूरजने सांगितलं की, गेल्या वर्षभरात त्याने जिओहॉटस्टार, अमेझॉन, स्टोरी टीव्ही आणि कुकू यांसारख्या प्लॅटफॉर्मवर १०० हून अधिक व्हर्टिकल सीरिजमध्ये काम केलं. व्हर्टिकल ड्रामाचे शूटिंग साधारण तीन दिवसांत पूर्ण होते आणि १५ दिवसांत पैसे मिळतात, त्यामुळे कलाकारांना काम आणि पेमेंटसाठी अनेक महिने वाट पाहावी लागत नाही, असंही त्याने नमूद केलं.

suraj-sonik-earning-vertical-micro-drama-earning (3)
अभिनेता सूरज सोनिक

सूरजने एक उदाहरण दिलं. एखाद्या शोमध्ये नर्स किंवा वॉर्ड बॉयची भूमिका केल्यासही एका दिवसाला ५ हजार रुपये मिळू शकतात. महिन्यात अशी १० कामं मिळाली तरी कलाकार ५० हजार रुपये कमवू शकतो.

मालिकांची संख्या झालीये कमी

सूरजच्या मते, टीव्ही मालिकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बालाजी टेलिफिल्म्ससह अनेक निर्मिती संस्थांच्या मालिका बंद झाल्या आहेत. सध्या ज्या मोजक्या मालिकांना चांगला TRP मिळतो, त्याच सुरू आहेत. या मालिकांमध्ये इन्फ्लुएन्सर्सऐवजी अनुभवी कलाकारांना काम मिळत आहे.

व्हर्टिकल किंवा शॉर्ट-फॉर्म ड्रामांकडे काही कलाकार कमीपणाने पाहतात. मात्र, सूरजच्या मते या माध्यमामुळे कलाकारांना सतत काम करता येतं, तसेच नवीन लोकांशी संपर्क वाढतो आणि कमाईही होते.

suraj-sonik-earning-vertical-micro-drama-earning (2)
अभिनेता सूरज सोनिक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर (फोटो- इन्स्टाग्राम)

UGC जाहिरातींमधूनही कमाई

कलाकार UGC जाहिरातींमधूनही चांगली कमाई करू शकतात. मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या प्रमोशनसाठी कलाकारांकडून रील्स बनवून घेतात. अशा प्रोजेक्टसाठी साधारण ५ हजार ते २० हजार रुपये मिळू शकतात. कलाकाराच्या प्रोफाइलनुसार ही रक्कम बदलते. सूरज अशा अनेक ब्रँड्सना स्वतःहून कोलॅबरेशनसाठी संपर्क करतो. अशाच एका कामातून त्याने कधी-कधी महिन्याला होणाऱ्या कमाईपेक्षा जास्त पैसे कमावले. सूरज ५० ब्रँड्सना कोलॅबरेशन रिक्वेस्ट पाठवतो. “अशा नियोजनबद्ध पद्धतीने काम करून मी मुंबईत स्वतःचं घर घेतलंय आणि मी लाखोंमध्ये कमाई करतो,” असं सूरज सोनिक म्हणाला.

suraj-sonik-earning-vertical-micro-drama-earning
अभिनेता सूरज सोनिक

भारतात मायक्रो ड्रामांची वाढती लोकप्रियता

भारतामध्ये शॉर्ट-फॉर्म आणि मायक्रो-ड्रामांचा प्रेक्षकवर्ग झपाट्याने वाढत आहे. जानेवारी २०२६ च्या ओरमॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार, सुमारे ६०.१२ कोटी लोकांनी मागील महिन्यात किमान एकदा तरी असा डिजिटल व्हिडीओ पाहिला होता. मायक्रो ड्रामाला एका वर्षाच्या आत तब्बल ७.३२ कोटी प्रेक्षक मिळाले. सध्या मायक्रो ड्रामाची बाजारपेट ५०० मिलियन डॉलर्सची आहे आणि पुढील पाच वर्षांत ती सात बिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

ऐश्वर्या सखुजा, करण पटेल आणि करणवीर बोहरा यांसारखे अनेक टीव्ही कलाकारही आता व्हर्टिकल ड्रामांमध्ये काम करत आहेत.