Vishal & Akshaya Haldi Ceremony : ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता विशाल निकम लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच विशालने आपल्या प्रेमाची कबुली देत ‘सौंदर्या’चा चेहरा सर्वांसमोर आणला होता. ही सौंदर्या म्हणजे अभिनेत्री अक्षया हिंदळकर. मागील काही दिवसांपासून दोघे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.

विशालने आधी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत होणाऱ्या पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर माझी ‘अर्धांगिनी’ म्हणत त्याने होणाऱ्या पत्नीचा चेहरा दाखवला आणि त्याचं नातं जगजाहिर केलं. त्यानंतर आता विशाल आणि अक्षया यांची लगीनघाई सुरू झाली आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अकडणार आहेत.

विशाल-अक्षया यांचा नुकताच साखरपुडा सोहळा संपन्न झाला. विशालने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला. हरिद्वारमध्ये दोघांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर आता दोघांचा हळदी सोहळादेखील पार पडला आहे. याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“आज प्रेमाला हळदीचा रंग लागला”, असं म्हणत विशाल-अक्षया यांनी त्यांच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून त्यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये एकमेकांना हळद लावत आहेत. या हळदी सोहळ्यासाठी अक्षयाने जांभळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. तर तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आहे.

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरच्या हळदीचे फोटो

विशाल आणि अक्षया यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोघांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हरिद्वारमध्ये साखरपुडा सोहळा पार पडल्यानंतर आता दोघे कुठे लग्न करणार आहेत, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांचं जुळलं असल्याचं म्हटलं जातं. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान, विशाल सध्या स्टार प्रवाहवरील येड लागलं प्रेमाचं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.