Vivian Dsena Blessed with Baby Boy: ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’ आणि ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारून अभिनेता विवियन डिसेनाला लोकप्रियता मिळाली. सध्या विवियन त्याच्या वैयक्तिक नाही, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विवियन व त्याच्या पत्नीने दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. विवियनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.
विवियन डिसेना ३७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. विवियनची पत्नी नूरन अली हिने मुलाला जन्म दिला आहे. विवियन डिसेनाने सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर केल्यानंतर चाहते व सेलिब्रिटी त्याच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. विवियन डिसेनाने पोस्टमध्ये काय म्हटलंय, ते पाहुयात.
“आम्ही काही काळ सर्वांच्या नजरेपासून दूर होतो… पण ते विनाकारण नव्हतं.
काही गोष्टींची घोषणा आधीच केली जात नाही,
तर त्या आधी मनापासून जगल्या जातात.
माझ्या शांततेने सर्व काही सांगून टाकलं होतं…
माझं जग आता अजून मोठं झाले आहे…
आणि यावेळी…
एका राजकुमाराचं आगमन झालं आहे,” अशी पोस्ट विवियन डिसेनाने इन्स्टाग्रामवर केली आहे.
पाहा विवियन डिसेनाची पोस्ट
विवियन डिसेनाच्या या पोस्टवर तेजिंदर बग्गा, स्नेहिल मेहरा, कंवर ढिल्लों या कलाकारांनी कमेंट्स करून मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन केलं आहे.
विवियन डिसेनाचं पहिलं लग्न व घटस्फोट
विवियन डिसेनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, विवियन डिसेनाचं पहिलं लग्न अभिनेत्री वाहबिज दोराबजीबरोबर झालं होतं. त्यांची भेट त्यांच्या ‘प्यार की ये एक कहानी’ (२०१०) या मालिकेच्या सेटवर झाली होती. तिथेच ते प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, २०१३ मध्ये त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या काही वर्षांनंतर, २०१६ मध्ये त्यांच्यात मतभेद सुरू झाले आणि ते वेगळे राहू लागले. दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर, २०२१ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. हा काळ त्यांच्या दोघांसाठीही कठीण होता, असं विवियनने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
विवियन डिसेनाने इस्लाम स्वीकारला
विवियन डिसेनाने २०१९ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला. “मी जन्माने ख्रिश्चन होतो आणि आता मी इस्लाम धर्माचे पालन करत आहे. २०१९ च्या रमजान महिन्यापासून मी दिवसातून पाच वेळा नमाज करण्यास सुरुवात केली,” असं तो म्हणाला होता. धर्म बदलल्यानंतर त्याच्या स्वभावात आणि जगण्याच्या पद्धतीत खूप सकारात्मक बदल झाले असंही त्याने म्हटलं होतं.
विवियन डिसेनाचं दुसरं लग्न
घटस्फोटानंतर विवियनने दुसरं लग्न केलं. विवियनची दुसरी पत्नी नूरन अली ही इजिप्तमधील एक माजी पत्रकार आहे. एका मुलाखतीच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. विवियनने नूरनशी इजिप्तमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले. सुरुवातीला त्याने लग्नाची माहिती लपवून ठेवली होती, पण नंतर त्याने स्वतः जाहीर केलं होतं. नूरन हिचंही हे दुसरं लग्न होतं. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली असून त्या तिच्याबरोबरच राहतात. विवियन आणि नूरन यांना लायन नावाची मोठी मुलगी आहे आणि आता नुकताच त्यांना एक मुलगा झाला आहे.
